Chandrapur News: काँग्रेसमधील धुसफूस; कुणी केला सभात्याग, तर कुणी व्यक्त केला गटनेत्यावर रोष!

Bhairav Diwase
चंद्रपूर:- चंद्रपूर शहर महानगरपालिकेत आज स्थायी समितीच्या १६ सदस्यांच्या निवडीवरून हायव्होल्टेज ड्रामा पाहायला मिळाला. महापौरांनी बंद लिफाफ्यातील नावांची घोषणा करताच, काँग्रेस या प्रमुख पक्षांमधील अंतर्गत गटबाजी चव्हाट्यावर आली आहे. एका बाजूला खासदार प्रतिभा धानोरकर गटाला मोठा धक्का बसला आहे.


चंद्रपूर मनपाच्या विशेष सभेत आज सर्वांचे लक्ष स्थायी समितीच्या निवडीकडे होते. मात्र, काँग्रेसमध्ये आमदार विजय वडेट्टीवार गटाने बाजी मारल्याचे स्पष्ट झाले आहे. काँग्रेसच्या वाट्याला आलेल्या ७ जागांवर सर्वच्या सर्व वडेट्टीवार समर्थक नगरसेवकांची वर्णी लागली आहे. यात वसंता देशमुख, सचिन कत्याल, राजेश अडूर, संजीवनी वासेकर, चंदा वैरागडे, सोफिया तवंगर आणि विनोद लभाने यांचा समावेश आहे. आपल्या एकाही समर्थकाला संधी न मिळाल्याने संतापलेल्या धानोरकर गटाच्या नगरसेवकांनी चक्क स्वतःच्याच गटनेत्याचा निषेध करत सभात्याग केला.

भाजपकडून सुभाष कासनगोट्टूवार, संजय कंचर्लावार, पुष्पा उराडे, सारिका संदूरकर, प्रज्वलंत कडू आणि सविता सरकार यांना संधी मिळाली आहे. तर शिवसेना (ठाकरे गट) कडून मनस्वी गिऱ्हे, श्रुती घटे आणि शेकाप तर्फे प्रदीप देशमुख यांची निवड झाली आहे.