सिंदेवाही:- सिंदेवाही तालुक्यातील गुंजेवाही जंगलात वाघाने भीषण हल्ला चढवत तब्बल चार महिलांना ठार केले आहे. या घटनेने संपूर्ण चंद्रपूर जिल्हा हादरून गेला असून परिसरात प्रचंड खळबळ उडाली आहे.
मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, गुंजेवाही गावातील काही महिला नेहमीप्रमाणे जंगलात तेंदूपत्ता संकलनासाठी गेल्या होत्या. सर्व महिला जंगलात एकत्रच तेंदूची पाने तोडत असताना, दबा धरून बसलेल्या वाघाने त्यांच्यावर अचानक हल्ला चढवला. या सर्व महिला जवळजवळ असल्याने वाघाने एकापाठोपाठ एक अशा चारही महिलांवर हल्ला करत त्यांना जागीच ठार केले.
चंद्रपूर जिल्ह्याच्या वन्यजीव संघर्षाच्या इतिहासातील ही पहिलीच अत्यंत दुर्दैवी आणि गंभीर घटना मानली जात आहे, जिथे एकाच वेळी वाघाने चार जणांचा बळी घेतला आहे. यात कवडुबाई दादाजी मोहुर्ले ४५, अनुबाई दादाजी मोहुर्ले ४६, संगिता संतोष चौधरी ३६, सुनिता कौशिक मोहुर्ले ३३ यांचा मृत्यू झाला.
या घटनेची माहिती मिळताच गुंजेवाही आणि परिसरातील गावांमध्ये भीतीचे सावट पसरले आहे. ग्रामस्थांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे. घटनेची गांभीर्य लक्षात घेऊन वनविभागाचे वरिष्ठ अधिकारी आणि पोलिसांचे पथक तात्काळ घटनास्थळाकडे रवाना झाले आहे. पुढील तपास आणि मृतदेह बाहेर काढण्याचे काम सुरू आहे.

