Vijay Wadettiwar: आ. विजय वडेट्टीवारांना पोलिसांनी घेतले ताब्यात

Bhairav Diwase
मुंबई:- काँग्रेसने भाजपविरोधात आक्रमक पवित्रा घेत दादर येथील भाजप कार्यालयावर धडक देण्याचा प्रयत्न केला. मुसळधार पावसातही काँग्रेस कार्यकर्त्यांनी आणि वरिष्ठ नेत्यांनी जोरदार घोषणाबाजी करत परिसर दुमदुमून टाकला. मात्र, पोलिसांनी हा मोर्चा वाटेतच अडवल्याने आंदोलनाला हिंसक वळण न मिळता नेत्यांनी रस्त्यावरच ठिय्या मांडला.


CJP च्या समर्थनार्थ काँग्रेसने या आंदोलनाची हाक दिली होती. मुंबईत दादर परिसरात एकत्र येत काँग्रेस कार्यकर्त्यांनी भाजप कार्यालयाकडे कूच केली. भर पावसात सुरू असलेल्या या आंदोलनादरम्यान सरकार आणि भाजपविरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली.


मोर्चा भाजप कार्यालयाजवळ पोहोचण्यापूर्वीच पोलिसांनी मोठा बंदोबस्त तैनात केला होता आणि काँग्रेस नेत्यांना पुढे जाण्यापासून रोखले. यानंतर संतप्त झालेल्या नेत्यांनी आणि कार्यकर्त्यांनी रस्त्यावरच ठिय्या आंदोलन सुरू केले.


परिस्थिती हाताबाहेर जाऊ नये म्हणून पोलिसांनी तात्काळ धरपकड सुरू केली. विरोधी पक्षनेते व काँग्रेसचे वरिष्ठ नेते विजय वडेट्टीवार यांना पोलिसांनी थेट उचलून पोलीस गाडीत टाकले. या कारवाईदरम्यान पोलीस आणि काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये तुफान बाचाबाची आणि खेचाखेची पाहायला मिळाली.


विजय वडेट्टीवार यांच्यासह काँग्रेसच्या प्रमुख नेत्यांना आणि कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेऊन थेट कुलाबा पोलीस ठाण्यात नेले आहे. या घटनेनंतर मुंबईत काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये तीव्र संतापाची लाट पसरली असून, सत्ताधाऱ्यांच्या या दडपशाहीविरोधात आंदोलन अधिक तीव्र करण्याचा इशारा काँग्रेसने दिला आहे.