चंद्रपूर:- चंद्रपूर महानगरपालिकेतील काँग्रेसच्या अंतर्गत गटबाजी आणि गटनेतेपदाच्या महिनाभरापासून चाललेल्या राजकीय नाट्यावर अखेर प्रशासकीय पडदा पडला आहे.
नागपूर विभागाच्या विभागीय आयुक्त विजयलक्ष्मी बिदरी यांनी उच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार सुनावणी पूर्ण करत मोठा निर्णय दिला आहे. राजेश मुरली अडूर यांची गटनेते पदावरील नियुक्ती रद्द करण्यात आली असून, आता सुरेंद्र विठ्ठलराव अडबाले यांची भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या महापालिका गटनेतेपदी अधिकृत नोंद करण्यात आली आहे.
चंद्रपूर महापालिकेत काँग्रेसचे एकूण २७ नगरसेवक निवडून आले आहेत. ६ फेब्रुवारी रोजी राजेश अडूर यांची सर्वानुमते गटनेते म्हणून निवड करण्यात आली होती. मात्र, पक्षांतर्गत सत्तासंघर्ष उफाळून आल्यानंतर १६ जून रोजी खासदार प्रतिभा धानोरकर समर्थक १६ नगरसेवकांनी अडूर यांना हटवून सुरेंद्र अडबाले यांची निवड करण्याचा ठराव सादर केला.
या निर्णयाविरोधात अडूर यांनी नागपूर खंडपीठात याचिका दाखल केली होती. उच्च न्यायालयाने दोन्ही बाजूंचे म्हणणे ऐकून कारणांसह निर्णय घेण्याचे निर्देश विभागीय आयुक्तांना दिले होते. ९ आणि १३ जुलै रोजी झालेल्या विस्तृत सुनावणीदरम्यान २७ पैकी १५ नगरसेवकांनी प्रत्यक्ष उपस्थित राहून सुरेंद्र अडबाले यांच्या नेतृत्वाला ठाम पाठिंबा दिला, तर ११ सदस्यांनी अडूर यांच्या बाजूने कौल दिला.
विभागीय आयुक्तांनी 'सुनील हरिभाऊ काळे विरुद्ध अविनाश मार्डीकर' या सर्वोच्च न्यायालयाच्या महत्त्वपूर्ण निकालाचा आधार घेत स्पष्ट केले की, स्थानिक स्वराज्य संस्थेतील गटनेत्याची निवड अथवा बदल हा बहुमताच्या लोकशाही मार्गानेच मान्य केला जातो. त्यानुसार २१ जुलै २०२६ पासून सुरेंद्र अडबाले यांची अधिकृत गटनेते म्हणून नोंदणी करण्यात आली आहे.
या निर्णयामुळे चंद्रपूर महापालिकेत खासदार प्रतिभा धानोरकर यांनी विधीमंडळ पक्षनेते आमदार विजय वडेट्टीवार यांच्यावर राजकीय मात केल्याचे चित्र स्पष्ट झाले आहे. प्रशासकीय स्तरावर हा वाद सुटला असला, तरी आगामी काळात याचे काय राजकीय आणि कायदेशीर पडसाद उमटतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

