Chandrapur Congress: विद्यार्थ्यांवर लाठीचार्ज अन् नेत्यांना अटक!

Bhairav Diwase
केंद्र सरकारविरोधात चंद्रपुरात काँग्रेसची जोरदार घोषणाबाजी
चंद्रपूर:- दिल्लीतील जंतर-मंतर येथे शांततापूर्ण मार्गाने सुरू असलेल्या विद्यार्थी आंदोलनादरम्यान काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी, प्रियंका गांधी यांच्यासह अनेक वरिष्ठ नेत्यांना पोलिसांनी ताब्यात घेतल्याच्या घटनेचे तीव्र पडसाद चंद्रपुरात उमटले आहेत. या घटनेच्या निषेधार्थ चंद्रपूर शहर (जिल्हा) काँग्रेस कमिटीच्या वतीने बुधवारी भव्य निषेध मोर्चाचे आयोजन करण्यात आले.


हा मोर्चा ऐतिहासिक गांधी चौक येथून निघून डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यापर्यंत काढण्यात आला. मोर्चादरम्यान काँग्रेस पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी केंद्र सरकारच्या धोरणांचा तीव्र निषेध नोंदवत जोरदार घोषणाबाजी केली.


लाठीचार्ज व अटकेचा तीव्र शब्दांत निषेध
काँग्रेसच्या वतीने देण्यात आलेल्या निवेदनानुसार, दिल्लीत विद्यार्थी आपले रास्त हक्क आणि मागण्यांसाठी शांततेत आंदोलन करत होते. मात्र, पोलिसांनी बळाचा वापर करत विद्यार्थ्यांवर अमानुष लाठीचार्ज केला, ज्यामध्ये अनेक विद्यार्थी गंभीर जखमी झाले. तसेच आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी पोहोचलेल्या काँग्रेस नेत्यांना पोलिसांनी बेकायदेशीरपणे ताब्यात घेतले. ही संपूर्ण कारवाई अत्यंत हुकूमशाही स्वरूपाची असून लोकशाही मूल्यांचा संकोच करणारी आहे, असा आरोप आंदोलनकर्त्यांनी केला.


केंद्र सरकारवर सडकून टीका
मोर्चादरम्यान काँग्रेस पदाधिकाऱ्यांनी केंद्र सरकारवर टीकास्त्र सोडले. "देशात लोकशाहीचा गळा घोटला जात असून विद्यार्थ्यांच्या न्यायासाठी उठणारा आवाज दडपण्याचा प्रयत्न केला जात आहे," असे नेत्यांनी सांगितले. तसेच दिल्लीतील या संपूर्ण घटनेची निष्पक्ष आणि सखोल चौकशी करण्यात यावी, दोषी पोलीस अधिकाऱ्यांवर तात्काळ कारवाई व्हावी आणि जखमी विद्यार्थ्यांना योग्य न्याय व वैद्यकीय मदत मिळावी, अशी ठाम मागणी काँग्रेसच्या वतीने करण्यात आली.


या निषेध आंदोलनात चंद्रपूर शहर जिल्हा काँग्रेस अध्यक्ष शिवा राव, माजी अध्यक्ष रामू तिवारी, प्रवीण पडवेकर, शहर महिला काँग्रेस अध्यक्ष चंदा वैरागडे, काँग्रेस नेते दिनेश चोखारे यांच्यासह काँग्रेसचे विविध आघाड्यांचे प्रमुख, लोकप्रतिनिधी, माजी नगरसेवक आणि मोठ्या संख्येने कार्यकर्ते सहभागी झाले होते. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास अभिवादन करून मोर्चाचा समारोप करण्यात आला.