Chandrapur News: चंद्रपुरात मनसेचे अमन अंधेवार यांच्यासह प्रमुख पदाधिकारी पोलीसांच्या ताब्यात!

Bhairav Diwase
रामनगर पोलिसांची कारवाई, नोटीस देऊन सुटका
चंद्रपूर:- NEET पेपरफुटी प्रकरणी केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी आपल्या पदाचा राजीनामा द्यावा आणि देशातील लाखो विद्यार्थ्यांचे शैक्षणिक भविष्य सुरक्षित करावे, या मागणीसाठी दिल्ली येथे ज्येष्ठ समाजसेवक सोनम वांगचुक यांच्या नेतृत्वाखाली तीव्र आंदोलन सुरू आहे. या आंदोलनाला महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने (मनसे) आधीच आपला जाहीर पाठिंबा दर्शवला आहे.


याच पार्श्वभूमीवर, आज २२ जुलै रोजी चंद्रपूर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर मनसेच्या वतीने एक दिवसीय शांततापूर्ण आणि अहिंसक उपोषण आंदोलनाचे आयोजन करण्यात आले होते. मात्र, रामनगर पोलिसांनी परवानगी नसल्याचे कारण देत हे आंदोलन थांबवले आणि मनसेच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांना ताब्यात घेतले.


भारतीय संविधानातील कलम १९ अन्वये प्रत्येक नागरिकाला अभिव्यक्ती स्वातंत्र्य आणि शांततेच्या मार्गाने आंदोलन करण्याचा अधिकार प्राप्त आहे. याच लोकशाही मार्गाने दिल्लीतील आंदोलनाला नैतिक पाठिंबा देण्यासाठी मनसे कामगार सेना जिल्हाध्यक्ष अमन अंधेवार यांच्या नेतृत्वाखाली चंद्रपुरात हे उपोषण सुरू करण्यात आले होते.


या आंदोलनात केवळ राजकीय कार्यकर्तेच नव्हे, तर चंद्रपुरातील विविध महाविद्यालयांचे विद्यार्थी, कोचिंग क्लासेसचे तरुण, सामाजिक संघटना आणि अगदी चंद्रपूर न्यायालयातील काही वकीलही सहभागी होणार होते. परंतु, आंदोलन सुरू होताच रामनगर पोलीस ठाण्याच्या पथकाने आंदोलन मंडपात प्रवेश केला आणि परवानगी नसल्याचा ठपका ठेवत मनसे पदाधिकाऱ्यांना ताब्यात घेतले.


पोलिसांची कारवाई आणि सुटका:

पोलीस कारवाईदरम्यान मनसे कामगार सेना जिल्हाध्यक्ष अमन अंधेवार, उपजिल्हाध्यक्ष राजू कुकडे, मनसे जनहीत जिल्हाध्यक्ष रमेश काळबांधे, सुनील गुढे, शहर अध्यक्ष पियुष धुपे यांच्यासह इतर अनेक पदाधिकारी व कार्यकर्त्यांना रामनगर पोलीस ठाण्यात नेण्यात आले. पोलीस ठाण्यात सर्व पदाधिकाऱ्यांना रीतसर नोटीस बजावून सोडण्यात आले आहे. मात्र, पोलिसांच्या या हस्तक्षेपामुळे आज २२ जुलै रोजी सुरू झालेले हे उपोषण आंदोलन मनसेच्या वतीने तूर्तास पुढे ढकलण्यात आल्याची माहिती पक्षाच्या वतीने देण्यात आली आहे.


आम्ही विद्यार्थ्यांच्या भवितव्यासाठी आणि NEET पेपरफुटीच्या विरोधात संविधानाने दिलेल्या अधिकारात शांततेने आंदोलन करत होतो. प्रशासनाने आमचा आवाज दाबण्याचा प्रयत्न केला असला, तरी विद्यार्थ्यांच्या हक्कासाठीचा आमचा लढा असाच सुरू राहील.
अमन अंधेवार (जिल्हाध्यक्ष, मनसे कामगार सेना)