पुणे:- शहर पोलिस दलातील भरती प्रक्रियेत खेळाडूंसाठी असलेल्या पाच टक्के आरक्षणाचा गैरफायदा घेत १९ उमेदवारांनी बनावट क्रीडा प्रमाणपत्रांच्या आधारे नोकरी मिळवल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. 'कुराश' या पारंपरिक कुस्तीच्या खेळाचे तसेच 'ड्रॅगनबोट' या सामूहिक नौकानयनाच्या खेळाचे खोटे प्रमाणपत्र तयार करून ते भरती प्रक्रियेत सादर करण्यात आल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे. या प्रकरणी गुन्हे शाखेने दोन जणांना अटक केली असून न्यायालयाने त्यांना ८ सप्टेंबरपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे.
कुराश, ड्रॅगनबोटच्या बनावट प्रमाणपत्रांचा वापर
महाराष्ट्र राज्य कुराश असोसिएशनचे अध्यक्ष अंकुश विठ्ठल नागर (वय ४०, रा. चंडीगड, मूळ रा. अहिल्यानगर) आणि सचिव शिवाजी साळुंखे (वय ४६, रा. फुरसुंगी) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. या दोघांसह परभणी जिल्हा संघटक कल्याण बालासाहेब मुरकुटे, धाराशिव जिल्हा संघटक चांदपाशा लालासाहेब शेख, इतर जिल्ह्यांतील संघटक तसेच अन्य आरोपींविरोधात शिवाजीनगर पोलिस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे.
वरिष्ठ पोलिस निरीक्षक दीपक लगड यांनी याबाबत तक्रार दिली आहे. संबंधित गैरप्रकार २०१६ ते २०२६ या कालावधीत झाल्याचे तपासात समोर आले आहे. तसेच या प्रकरणातील भरती झालेल्या उमेदवारांपैकी नऊ जण प्रशिक्षणासाठी गेल्याचेही तपासादरम्यान निदर्शनास आले आहे.
२०१६ ते २०२६ दरम्यान बनावट कागदपत्रे
पुणे शहर पोलिस दलातील २०२४-२६ या वर्षातील पोलिस भरतीमध्ये १९ उमेदवारांनी 'कुराश' आणि 'ड्रॅगनबोट' या क्रीडा प्रकारांची बनावट प्रमाणपत्रे सादर केल्याची तक्रार एका व्यक्तीने पुराव्यांसह केली होती. या तक्रारीच्या आधारे करण्यात आलेल्या तपासात गंभीर बाबी समोर आल्या.
तपासानुसार, २०१६ ते २०२६ या कालावधीत संबंधित आरोपींनी कोणत्याही क्रीडा स्पर्धांचे आयोजन न करता बनावट कागदपत्रे आणि क्रीडा अभिलेख तयार केल्याचे आढळले. या बनावट नोंदींच्या आधारे तयार करण्यात आलेली प्रमाणपत्रे पोलिस भरतीच्या वेळी वापरण्यात आली.
पोलिस मैदानावर सादर केली प्रमाणपत्रे
शिवाजीनगर येथील पोलिस मैदानावर झालेल्या भरती प्रक्रियेदरम्यान संबंधित बनावट प्रमाणपत्रे सादर करण्यात आली. या माध्यमातून राज्य सरकारकडून खेळाडूंसाठी लागू करण्यात आलेल्या पाच टक्के आरक्षणाचा गैरमार्गाने लाभ घेत सरकारची फसवणूक करण्यात आल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे.
दरम्यान, या प्रकरणात पोलिस दलातील तसेच क्रीडा विभागातील काही व्यक्तींचा सहभाग असण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली असून, त्या अनुषंगानेही तपास सुरू आहे.

