Ghodzari sub-canal ruptured: १५ वर्षांच्या प्रतीक्षेनंतर कालव्यात पाणी

Bhairav Diwase
अवघ्या दहा तासांत घोडाझरी उपकालवा फुटला!
नागभीड:- दीर्घ प्रतीक्षेनंतर अखेर गोसेखुर्द प्रकल्पाच्या घोडाझरी उपकालव्यात पाणी सोडण्यात आले खरे, मात्र हा आनंद अवघ्या काही तासांचाच ठरला. पाणी सोडल्यानंतर अवघ्या १० तासांत नागभीड तालुक्यातील तळोधी (बा.) जवळील ओवाळा गावानजीक हा उपकालवा फुटला. त्यामुळे हजारो लिटर पाणी थेट आजूबाजूच्या शेतांमध्ये घुसून पिकांचे अतोनात नुकसान झाले आहे. १५ वर्षे काम चालल्यानंतर मागील वर्षीच पूर्ण झालेल्या या कालव्याच्या पहिल्याच दिवशी झालेल्या या दुरवस्थेमुळे बांधकामाच्या दर्जावर आणि प्रशासनाच्या कारभारावर गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे.


नेमकी घटना काय?

ब्रह्मपुरी, नागभीड आणि सिंदेवाही तालुक्यातील हजारो हेक्टर शेतीला सिंचनाचा लाभ मिळावा यासाठी १५ वर्षांपासून घोडाझरी उपकालव्याचे काम सुरू होते. यंदा पावसाने दांडी मारल्याने शेतकरी आधीच संकटात सापडले होते. धानपिकांची रोवणी व सुकणारी रोपे वाचवण्यासाठी शेतकऱ्यांनी कालव्यात पाणी सोडण्याची मागणी लावून धरली होती. त्या धर्तीवर कालव्यात विधिवत पाणी सोडण्यात आले.


परंतु, सायंकाळच्या सुमारास ओवाळा गावाजवळ अचानक कालव्याला मोठे भगदाड पडले. काही वेळातच पाण्याचा प्रचंड प्रवाह शेतांमध्ये शिरला. घटनेची माहिती मिळताच अधिकाऱ्यांनी कालव्याचे मुख्य पाणी बंद केले असले, तरी रात्रभर फुटलेल्या ठिकाणातून पाणी शेतात वाहत राहिल्याने धानाची पऱ्हे आणि रोपे पाण्याखाली जाऊन नुकसान झाले आहे.


गुणवत्तेवर प्रश्नचिन्ह अन् चौकशीची मागणी

प्रशासनाने गेल्या वर्षीच या कालव्याचे काम पूर्ण झाल्याचा दावा केला होता. मात्र, पाण्याचा पहिलाच दाब हा कालवा सहन करू शकला नाही. यावरून कंत्राटदार आणि संबंधित सिंचन विभागाच्या अधिकाऱ्यांनी संगनमताने निकृष्ट दर्जाचे काम केल्याचा आरोप स्थानिक शेतकऱ्यांकडून केला जात आहे. याप्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्याची व बाधित शेतकऱ्यांना तात्काळ भरपाई देण्याची मागणी आता जोर धरू लागली आहे.