Chandrapur News: स्थानिक आमदारांच्या 'त्या' विश्वासू महिला पदाधिकाऱ्यांच्या मालमत्तेची चौकशी करा

Bhairav Diwase
शिवसेना शिष्टमंडळाची थेट पोलीस अधीक्षकांकडे मागणी
चंद्रपूर:- चंद्रपूर शहरात नवजात शिशुंच्या अवैध विक्रीचे एक धक्कादायक रॅकेट उघडकीस आले असून, या प्रकरणात रामनगर पोलिसांनी भारतीय जनता पक्षाच्या दोन महिला पदाधिकाऱ्यांना सायली येरणे आणि भाग्यश्री हांडे अटक केल्याने राजकीय वर्तुळात प्रचंड खळबळ उडाली आहे. या गंभीर प्रकरणाची पाळेमुळे खोलवर तपासण्यासाठी आज शिवसेना चंद्रपूरच्या वतीने पोलीस अधीक्षक साहेबांची भेट घेऊन त्यांना एक जाहीर मागणीचे पत्र सुपूर्द करण्यात आले.


या प्रकरणात अटक करण्यात आलेल्या दोन्ही महिला या स्थानिक आमदारांच्या गेल्या अनेक वर्षांपासून अत्यंत विश्वासू आणि निकटवर्तीय कार्यकर्त्या म्हणून ओळखल्या जातात. त्यामुळे या हाय-प्रोफाईल गुन्ह्यात राजकीय दबाव येण्याची दाट शक्यता वर्तवली जात आहे. पोलिसांनी कोणाच्याही दबावाला बळी न पडता या संपूर्ण प्रकरणाची अत्यंत पारदर्शक आणि निष्पक्ष चौकशी करावी, तसेच या आरोपी महिलांची बेकायदेशीर संपत्ती आणि आर्थिक व्यवहारांची सखोल चौकशी करून त्यांना कठोर शिक्षा होईल याची दक्षता घ्यावी, अशी आग्रही मागणी शिवसेनेच्या शिष्टमंडळाने केली आहे.


हे निवेदन शिवसेना पक्ष सचिव मनीषा कायंदे, लोकसभा संपर्क प्रमुख कृपालजी तुमाने, आणि पूर्व विदर्भ संघटक किरण पांडव यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हाप्रमुख प्रतिमा ठाकूर यांच्या नेतृत्वात या शिष्टमंडळाने पोलीस अधीक्षकांची भेट घेतली.


या प्रसंगी महानगरप्रमुख भरत गुप्ता, उपजिल्हाप्रमुख माया मेश्राम, तालुका प्रमुख अंजू लेनगुरे, विधानसभा प्रमुख सीमा रामेडवार, प्रियांका गुप्ता, शितल ढाले यांच्यासह मोठ्या संख्येने शिवसैनिक आणि पदाधिकारी उपस्थित होते.