सिंदेवाही:- चंद्रपूरच्या सिंदेवाही तालुक्यात बस आणि ट्रकची समोरासमोर भीषण धडक झाली आहे. या भीषण अपघातात तब्बल २२ प्रवासी जखमी झाले असून ६ जणांची प्रकृती गंभीर असल्याची प्राथमिक माहिती मिळते आहे. राजुराकडून तुमसरकडे जात असताना पळसगाव जाट गावाजवळील पुलावर हा अपघात घडला आहे. अपघाताची तीव्रता इतकी भीषण होती की बसच्या समोरील भागाचा चक्काचूर झाला आहे.
चंद्रपूर जिल्ह्यातील सिंदेवाही तालुक्यामधून जाणार्या नागभीड-मूल मार्गावर हा भीषण अपघात घडला. राजुरावरून तुमसरकडे जाणाऱ्या तुमसर डेपोच्या एसटी बसला पळसगाव जाट गावाजवळील पुलावर समोरून येणाऱ्या ट्रकने जोरदार धडक दिली. या धडकेनंतर बसमध्ये एकच गोंधळ आणि किंकाळ्या ऐकायला आल्या. स्थानिक नागरिकांनी प्रसंगावधान राखत तातडीने घटनास्थळी धाव घेतली आणि मदतकार्य सुरू केले.
या अपघातात एकूण २२ प्रवासी जखमी झाले आहेत. त्यापैकी १६ प्रवाशांना किरकोळ दुखापत झाली असून ६ प्रवाशांची प्रकृती गंभीर आहे. सर्व जखमी प्रवाशांना तातडीने उपचारासाठी सिंदेवाही येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
या घटनेची माहिती मिळताच सिंदेवाही पोलीस तातडीने घटनास्थळी दाखल झाले असून त्यांनी वाहतूक कोंडी दूर केली आहे. हा अपघात नेमका कसा झाला, याचा पुढील तपास सिंदेवाही पोलीस करत आहेत.

