Chandrapur News: दुचाकीसमोर अचानक आला रानटी हत्ती

Bhairav Diwase
वाहन सोडून पळाले, पण हत्तीने पाठलाग करून घेतला जीव!

चंद्रपूर:- गेल्या अनेक दिवसांपासून धुमाकूळ घालणाऱ्या रानटी हत्तींनी आता थेट एका नागरिकाचा बळी घेतला आहे. व्याहाड–सोनापूर मार्गावर हत्तीने केलेल्या हल्ल्यात अतुल गोहने या व्यक्तीचा जागीच मृत्यू झालाय.


मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, व्याहाड येथील रहिवासी अतुल गोहने हे दुचाकीने सोनापूरच्या दिशेने जात होते. याच दरम्यान व्याहाड-सोनापूर मार्गावर त्यांच्या दुचाकीसमोर अचानक एक अजस्त्र रानटी हत्ती येऊन उभा ठाकला. समोर काळ उभा असलेला पाहताच अतुल यांनी प्रसंगावधान राखत आपली दुचाकी रस्त्यावरच टाकली आणि जीव वाचवण्यासाठी जंगलाच्या दिशेने धाव घेतली. मात्र, संतप्त हत्तीने त्यांचा पाठलाग केला आणि त्यांच्यावर भीषण हल्ला चढवला. या हल्ल्यात अतुल गोहने यांचा जागीच दुर्दैवी मृत्यू झाला.


घटनेची माहिती मिळताच वनविभागाचे अधिकारी आणि कर्मचाऱ्यांसह स्थानिक नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली. वनविभागाकडून मृतदेहाचा पंचनामा करण्याची प्रक्रिया सुरू आहे. मात्र, या घटनेमुळे संपूर्ण सावली तालुक्यात शोककळा पसरली असून नागरिकांमध्ये तीव्र संताप पाहायला मिळतोय. गेल्या अनेक आठवड्यांपासून या भागात हत्तींचा मुक्त संचार सुरू आहे. आधी शेतीचे नुकसान आणि आता थेट माणसाचा बळी गेल्यामुळे वनविभागाच्या उपाययोजनांवर आता गंभीर प्रश्न उपस्थित केले जात आहेत.