भाजप महिला आघाडीची पोलीस अधीक्षकांकडे आक्रमक मागणी!
चंद्रपूर:- शहरात खळबळ उडवून देणाऱ्या नवजात बालक विक्री प्रकरणाची सखोल आणि निष्पक्ष चौकशी मुख्य सुत्रधाराला अटक करण्यासाठी विशेष तपास पथक अर्थात 'एसआयटी' (SIT) स्थापन करण्यात यावी, अशी आक्रमक मागणी आज भारतीय जनता पक्ष जिल्हा महिला आघाडीच्या वतीने करण्यात आली. या संदर्भातील एक सविस्तर मागणीचे निवेदन भाजप महिला आघाडीने नवनियुक्त जिल्हा पोलीस अधीक्षक आयुष नोपानी यांना सादर केले.
शहरातील दोन महिलांनी नवजात बालकाची विक्री केल्याचा अत्यंत गंभीर प्रकार उघडकीस आला आहे. या घटनेचे गांभीर्य लक्षात घेता, या प्रकरणाच्या पाठीमागे एखादी मोठी टोळी कार्यरत असण्याची शक्यता नाकारता येत नाही. यापूर्वी सुद्धा संबंधित महिलांनी अशा प्रकारचे गंभीर गुन्हे केले असण्याची दाट शक्यता असून, त्यांचे धागेदोरे इतर शहरांशीही जुळलेले असू शकतात, असा संशय भाजप महिला आघाडीने व्यक्त केला आहे.
पोलीस अधीक्षक आयुष नोपानी यांना देण्यात आलेल्या निवेदनात, या संपूर्ण प्रकरणाच्या मुख्य सूत्रधाराचा शोध घेऊन त्याला तात्काळ अटक करण्याची मागणी करण्यात आली आहे. तसेच गुन्ह्याची व्याप्ती मोठी असण्याची शक्यता असल्याने, संशयित महिलांची सखोल चौकशी करण्यासाठी त्यांना जास्तीत जास्त काळ पोलीस कोठडीत ठेवण्यात यावे, जेणेकरून या रॅकेटची अधिकाधिक माहिती समोर येऊ शकेल, अशी विनंतीही करण्यात आली.
यावेळी निवेदन देताना भाजपच्या ज्येष्ठ नगरसेविका सुनीता जयस्वाल, नगरसेवक रवी लोणकर यांच्यासह नम्रता आचार्य ठेमस्कर, शीला चव्हाण, माया उईके, मुग्धा खाडे, मनिषा महातव, समिस्ता फारुकी, हिना पठाण आणि जयश्री आत्राम यांच्यासह पक्षाच्या इतर महिला पदाधिकारी व कार्यकर्त्या उपस्थित होत्या.

