Chandrapur News: चंद्रपुरात मध्यरात्री हायव्होल्टेज ड्रामा; मनपा आयुक्त कार्यालयात सत्ताधारी नगरसेवकांचा ठिय्या!

Bhairav Diwase

चंद्रपूर:- चंद्रपूर महानगरपालिकेमध्ये सत्ताधारी भाजपमध्येच आता उघड संघर्ष चव्हाट्यावर आलाय. उद्या होणारी मनपाची बहुप्रतीक्षित सर्वसाधारण सभा ऐनवेळी रद्द करण्यात आली आहे. आणि याच निर्णयाच्या निषेधार्थ सत्ताधारी भाजपमधील आमदार किशोर जोरगेवार गटाच्या नगरसेवकांनी थेट मनपा आयुक्तांच्या कार्यालयाला घेराव घातला.


रात्री ९ वाजल्यापासून संतप्त नगरसेवकांनी आयुक्तांच्या दालनातच ठिय्या आंदोलन सुरू केलंय. आमसभा नेमकी कोणत्या कारणामुळे रद्द झाली? याचा जाब विचारत नगरसेवकांनी आयुक्तांना धारेवर धरलं. मात्र, आयुक्तांकडून समाधानकारक उत्तर न मिळाल्यानं नगरसेवकांनी रात्रभर कार्यालयातच मुक्काम ठोकण्याचा इशारा दिला आहे.


चंद्रपूर मनपाच्या या राजकीय भूकंपाने संपूर्ण जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. उद्या म्हणजेच ३ जुलै रोजी होणारी सर्वसाधारण सभा अचानक रद्द झाल्याचे समजताच आमदार किशोर जोरगेवार गटाचे नगरसेवक आक्रमक झाले. थेट आयुक्तांच्या दालनात घुसत त्यांनी ठिय्या आंदोलन सुरू केलं.


विशेष म्हणजे, हे नगरसेवक एवढ्यावरच थांबलेले नाहीत, तर उद्या महापौर संगीता खांडेकर यांच्या निषेधार्थ तीव्र आंदोलन करण्यात येणार असल्याचंही त्यांनी जाहीर केलं आहे. भाजपच्याच महापौरांविरुद्ध भाजपच्याच एका गटाने पुकारलेल्या या बंडामुळे महापालिकेतील अंतर्गत कलह आणि सत्तासंघर्ष आता थेट चव्हाट्यावर आला आहे. आयुक्त कार्यालयातील या तणावानंतर आता वरिष्ठ पातळीवरून काय हालचाली होतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.