Chandrapur News: चंद्रपूर मनपात सत्ताधारी भाजपमध्येच जुंपली!

Bhairav Diwase
आमदार जोरगेवार गटाचा आयुक्तांच्या दालनात ठिय्या, महापौरांचा तीव्र निषेध!
चंद्रपूर:- चंद्रपूर मनपाची आज होणारी सर्वसाधारण सभा ऐनवेळी रद्द करण्यात आल्यामुळे सत्ताधारी भाजपमधील अंतर्गत वाद आता उघडपणे चव्हाट्यावर आला आहे. आमदार किशोर जोरगेवार गटाच्या नगरसेवकांनी काल थेट मनपा आयुक्तांच्या कार्यालयावर धडक देत रात्री ९ वाजता तीव्र आंदोलन केले.


चंद्रपूर महानगरपालिकेची आज होणारी महत्त्वपूर्ण आमसभा अचानक रद्द करण्यात आली. सभा रद्द झाल्याचे समजताच सत्ताधारी भाजपमधील आमदार किशोर जोरगेवार गटाचे नगरसेवक आक्रमक झाले. काल रात्री ९ वाजताच्या सुमारास या संतप्त नगरसेवकांनी थेट मनपा आयुक्तांचे दालन गाठले आणि त्यांना घेराव घातला. आमसभा नेमकी कोणत्या कारणास्तव रद्द करण्यात आली? असा जाब नगरसेवकांनी आयुक्तांना विचारला. मात्र, आयुक्तांकडून कोणतेही समाधानकारक उत्तर न मिळाल्याने नगरसेवकांचा पारा चढला आणि त्यांनी आयुक्तांच्या दालनातच ठिय्या आंदोलन सुरू केले.


या राजकीय गोंधळाचे पडसाद आज सुद्धा पाहायला मिळाले. आज महापौर संगीता खांडेकर यांच्या निषेधार्थ महानगरपालिकेत जोरदार आंदोलन करण्यात आले. यावेळी संतप्त नगरसेवकांनी महापौरांच्या मर्जीतील स्वीकृत सदस्यांची नावे अजेंड्यात नसल्यामुळेच ही आमसभा पूर्वनियोजितपणे रद्द करण्यात आल्याचा थेट आरोप जोरगेवार गटाने केला आहे. 'महापौर हाय हाय' अशा घोषणाबाजीने आज मनपा परिसर दणाणून गेला होता. या संपूर्ण प्रकारामुळे सत्ताधारी भाजपमधील दोन गटांतील संघर्ष आता उघड झाला असून चंद्रपूरच्या राजकीय वर्तुळात याचीच चर्चा रंगली आहे.