Tiger Attack: वाघाच्या हल्ल्यात गुराख्याचा मृत्यू

Bhairav Diwase
पोंभुर्णा:- पोंभूर्णा तालुक्यातील सातारा भोसले येथील रहिवासी उष्टू पोरेते वय 55 वर्षे यांचा वाघाच्या हल्ल्यात मृत्यू झाला आहे. आज दुपारी ३ वाजेच्या सुमारास ही घटना घडली आहे. मृत उष्टू पोरेते हे आज नेहमीप्रमाणे एफडीसीएम (FDCM) कक्ष क्रमांक 441 जंगल परिसरात गाई चारायला गेले होते. दुपारी तीन वाजेच्या सुमारास दाट झाडीत दबा धरून बसलेल्या वाघाने अचानक त्यांच्यावर जोरदार हल्ला चढवला.


हा हल्ला इतका अचानक आणि भीषण होता की, उष्टू पोरेते यांना स्वतःचा बचाव करण्याची साधी संधीही मिळाली नाही. वाघाच्या या जीवघेण्या हल्ल्यात त्यांचा जागीच मृत्यू झाला. तर त्यांच्यासोबत असलेला निळकंठ पेंदोर वय 37 वर्षे यांनी प्रसंगावधान राखत झाडावर चढला त्याच्या मोबाईलचे लोकेशन पोलीसांनी काढत घटनास्थळी पोहचलो त्यामुळे निलकंठ याचा जीव वाचला आहे.


घटनेची माहिती मिळताच परिसरातील ग्रामस्थांनी घटनास्थळाकडे धाव घेतली. या दुर्दैवी घटनेमुळे संपूर्ण सातारा भोसले आणि पोंभूर्णा परिसरात प्रचंड भीतीचे व शोकाकुल वातावरण पसरले आहे.

घटनेची माहिती मिळताच संतप्त गावकऱ्यांनी जंगल परिसराकडे धाव घेतली. घटनेचे गांभीर्य ओळखून वनविभागाचे अधिकारी तसेच उमरी पोलीस ठाण्याचे ठाणेदार प्रविण सोनोने आपल्या पथकासह तातडीने घटनास्थळी दाखल झाले.

पोलीस आणि वन कर्मचाऱ्यांनी घटनास्थळाचा पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी पोंभूर्णा ग्रामीण रुग्णालयात रवाना केला आहे.

परिसरात वाघाचा वावर सातत्याने वाढत असल्याने शेतकरी आणि गुराख्यांच्या जीवाला मोठा धोका निर्माण झाला आहे. वनविभागाने या हिंस्त्र वाघाचा तात्काळ बंदोबस्त करावा आणि मृतकांच्या कुटुंबाला तातडीने मदत द्यावी, अशी तीव्र मागणी आता ग्रामस्थांकडून केली जात आहे.


घटनेची माहिती मिळताच वनविभागाचे पथक आणि पोलीस प्रशासन घटनास्थळी दाखल झाले असून पुढील कारवाई सुरू आहे. मात्र, वारंवार होणाऱ्या अशा हल्ल्यांमुळे ग्रामीण भागातील नागरिकांमध्ये भीतीसोबतच प्रशासनाविरोधात मोठा संताप पाहायला मिळत आहे.