Pombhurna News: दिल्लीतील लाठीचार्जचे पोंभूर्ण्यात तीव्र पडसाद; शहर कडकडीत बंद!

Bhairav Diwase
पोंभूर्णा:- दिल्लीतील जंतर-मंतर येथे आंदोलनादरम्यान विद्यार्थ्यांवर झालेल्या लाठीचार्जच्या निषेधार्थ गुरुवारी पोंभूर्णा शहरात कडकडीत बंद पाळण्यात आला. वंचित बहुजन आघाडी, शिवसेना (उबाठा), कांग्रेस व कृती समिती तसेच विविध सामाजिक, राजकीय व विद्यार्थी संघटनांनी दिलेल्या बंदच्या हाकेला व्यापारी, व्यावसायिक व नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिल्याने शहरातील मुख्य बाजारपेठेसह व्यापारी प्रतिष्ठाने दिवसभर बंद राहिली. त्यामुळे शहरात सर्वत्र शुकशुकाटाचे चित्र दिसून आले.


गणेश वासलवार यांच्या नेतृत्वाखाली बंदच्या पार्श्वभूमीवर वंचित बहुजन आघाडी, शिवसेना (उबाठा), कांग्रेस व विविध संघटनांचे कार्यकर्ते, विद्यार्थी, युवक आणि नागरिक मोठ्या संख्येने एकत्र येऊन शहरातून रॅली काढण्यात आली. विद्यार्थ्यांवरील लाठीचार्जचा निषेध करत केंद्र सरकार विरोधात जोरदार घोषणाबाजी केली.गणेश वासलवार यांच्या नेतृत्वात रॅलीचे रुपांतर सभेत झाले. यादरम्यान मान्यवरांनी रॅलीला मार्गदर्शन केले. बंद दरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी पोंभूर्णा पोलिसांनी शहरातील प्रमुख चौक, बाजारपेठेत पोलिस बंदोबस्त ठेवला होता.


दिल्लीच्या जंतर मंतर येथे झालेल्या लाठीचार्ज दरम्यान एका युवतीच्या दुर्देवी मृत्यू प्रित्यर्थ पोंभूर्णा येथील सावित्रीमाई फुले चौकातील सभास्थळी दोन मिनिट मौन पाळण्यात आला. सभास्थळी तहसीलदार मोहनिश शेलवटकर यांनी मागण्यांचे निवेदन स्वीकारले.


आंदोलनात गणेश वासलवार,अविनाश वाळके, ओमेश्वर पद्मगिरीवार, वासुदेव पाल, श्याम गेडाम, सदगुरू ढोले, अशोक गेडाम, बालाजी मेश्राम, रविंद्र तेलसे, जयपाल गेडाम, मनीष राऊत, प्रशांत झाडे, श्रीकांत शेंडे, कुमोद रायपुरे, सुनील कुंदोजवार, रामेश्वरी वासलवार, रिना ऊराडे, अभिषेक बद्दलवार, नंदकिशोर बुरांडे यांच्यासह विविध संघटनांचे पदाधिकारी, विद्यार्थी व नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले.