पोलिसांचा गुन्हेगारी प्रवृत्तींवर कडक प्रहार
चंद्रपूर:- चंद्रपूर शहर व परिसरात कायदा आणि सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी, तसेच गुन्हेगारी प्रवृत्तींना आळा घालण्यासाठी जिल्हा पोलीस प्रशासनाने धडक कारवाई सुरू केली आहे. नागरिकांमध्ये दहशत निर्माण करणाऱ्या ५ सराईत गुन्हेगारांवर महाराष्ट्र पोलीस कायदा १९५१ च्या कलम ५६ अन्वये तडीपारीची कारवाई करण्यात आली आहे.
तडीपार करण्यात आलेले आरोपी:
1) किसन उर्फ अमन महेंद्र डोगरे (वय २७, रा. महावीर नगर, भिवापूर वार्ड, चंद्रपूर)
2) विशाल पापा तांबे (वय ३०, रा. बाबुपेठ बाबानगर, चंद्रपूर)
3) गणेश राजू बैस (वय २५, रा. बिनबा गेटजवळ, बिनबा वार्ड, चंद्रपूर)
4) अनिल हिरामन ठाकूर (वय ४४, रा. नांदगाव पोडे, बल्लारशाह)
5) नरसिंग गट्टू रेवेल्लीवार (वय ५५, रा. प्रकाश नगर, महाकाली कॉलरी, चंद्रपूर)
या पाचही आरोपींवर चोरी, घरफोडी, प्राणघातक हल्ला, अवैध शस्त्रे बाळगणे आणि बेकायदेशीर दारूविक्री यांसारखे अनेक गंभीर गुन्हे नोंद आहेत. त्यांच्या दहशतीमुळे नागरिक व साक्षीदार पुढे येऊन साक्ष देण्यास घाबरत होते. चंद्रपूर शहर व रामनगर पोलिसांनी सादर केलेल्या प्रस्तावाची पडताळणी करून उपविभागीय दंडाधिकाऱ्यांनी हे तडीपारीचे आदेश जारी केले.
सदर कारवाई पोलीस अधीक्षक आयुष नोपानी आणि अपर पोलीस अधीक्षक ईश्वर कातकडे यांच्या मार्गदर्शनाखाली उपविभागीय पोलिस अधिकारी प्रमोद चौगुले, पोलीस निरीक्षक निशीकांत रामटेके आणि प्रभावती एकुरके यांच्या पथकाने केली आहे.

