चंद्रपूर:- सिंदेवाही तालुक्यातील गुंजेवाही जंगलात वाघाने तब्बल चार महिलांना ठार केल्याची घटना ताजी असतानाच, आता चंद्रपूर तालुक्यातील वरवट परिसरातून वाघाच्या हल्ल्याची आणखी एक घटना समोर आली आहे. यामुळे संपूर्ण चंद्रपूर जिल्हा हादरून गेला असून नागरिकांमध्ये प्रचंड घबराट पसरली आहे.
मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, आज सकाळी चंद्रपूर जिल्ह्यातील वरवट येथील रहिवासी असलेल्या योगिता चंद्रपाल जेंगठे या इतर महिलांसोबत ताडोबा बफर झोन मधील जंगलात तेंदूपत्ता संकलनासाठी गेल्या होत्या. महिला जंगलात तेंदूपत्ता संकलन करत असतानाच, दबा धरून बसलेल्या वाघाने अचानक योगिता यांच्यावर भीषण हल्ला चढवला.
वाघाने झडप घालताच सोबत असलेल्या इतर महिलांनी प्रसंगावधान राखून प्रचंड आरडाओरडा करण्यास सुरुवात केली. महिलांचा हा आक्रोश आणि आरडाओरडा ऐकून वाघाने घाबरून जंगलात पळ काढला. या धाडसामुळे योगिता जेंगठे यांचे प्राण वाचले असले, तरी त्या या हल्ल्यात गंभीर जखमी झाल्या आहेत. त्यांना तातडीने उपचारासाठी चंद्रपूर येथील जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आले असून, त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.
गुंजेवाहीतील चार महिलांचा मृत्यू आणि त्यानंतर वरवट येथील ही घटना, यामुळे वनविभागाच्या सुरक्षेवर आता मोठे प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. तेंदूपत्ता हंगामात जंगलात जाणाऱ्या नागरिकांच्या सुरक्षेसाठी प्रशासन काय पावले उचलणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

