Bandu Dhotre: फक्त ५ महिन्यांत १९ मृत्यू होऊनही वन विभाग सुस्तच!

Bhairav Diwase
वन्यजीव अभ्यासक बंडू धोत्रे यांची वन प्रशासनावर तीव्र टीका
चंद्रपूर:- सिंदेवाही वनक्षेत्रात आज सकाळी निसर्गाचं आणि मानवाचं जे क्रूर रूप पाहायला मिळालं, त्याने संपूर्ण महाराष्ट्र हादरला आहे. पोटाची खळगी भरण्यासाठी, उदरनिर्वाहासाठी जंगलात तेंदूपत्ता गोळा करायला गेलेल्या तब्बल ४ महिलांचा वाघाच्या हल्ल्यात एकाच वेळी मृत्यू झाला आहे. तर वरवट येथील महिलेवर वाघाने हल्ला केला असून महिला गंभीर जखमी झाली आहे. ही अत्यंत दुर्दैवी घटना आज सकाळी घडली आणि या घटनेने सिद्ध केलं आहे की, चंद्रपूर जिल्ह्यातील मानव-वन्यप्राणी संघर्ष आता थेट मृत्यूच्या दारात येऊन पोहोचला आहे. जो तेंदूपत्ता या गरीब कुटुंबांसाठी रोजगाराचे साधन होता, तोच आज त्यांच्यासाठी काळ बनून आला.


गेल्या ५ वर्षांची आकडेवारी पाहिली, तर २०२१ ते २०२५ या काळात तब्बल २०० निरपराध नागरिकांना आपल्या प्राणाला मुकावे लागले आहे. आणि चालू वर्षात, म्हणजेच २०२६ च्या केवळ ५ महिन्यांतच हा आकडा १९ वर जाऊन पोहोचला आहे! विचार करा, २०० + १९ हा वन विभागासाठी फक्त कागदावरचा आकडा असू शकतो, पण प्रत्यक्षात ही उद्ध्वस्त झालेल्या २१९ कुटुंबांची खरीखुरी आणि वेदनादायी संख्या आहे.


दरवेळी अशा घटना घडल्या की शासनाकडून सानुग्रह मदतनिधी जाहीर केला जातो. पण लोकांचे जीव गेल्यानंतर मदतनिधीची रक्कम वाढवून देणे हा यावरचा पर्याय असूच शकत नाही! या गंभीर समस्येवर आता कायमस्वरूपी आणि ठोस उपाययोजना अमलात आणण्याची वेळ आली आहे. दुर्दैवाने, “रोज मरे त्याला कोण रडे” अशी अवस्था आज चंद्रपूर जिल्ह्याची झाली असून, सर्वाधिक मानव-वन्यजीव संघर्ष आणि मृत्यू होणारा जिल्हा अशी या क्षेत्राची नवीन आणि भीतीदायक ओळख निर्माण झाली आहे.

नुकतेच वन्यजीव अभ्यासक बंडू धोत्रे यांनी या प्रलंबित मागण्यांसाठी आणि वन्यजीव संरक्षणासाठी "अन्नत्याग सत्याग्रह" आंदोलन केले होते. मात्र, प्रशासनाने आणि वन विभागाने त्यावर अद्याप कोणतीही ठोस कार्यवाही केलेली नाही. प्रशासनाच्या याच अकार्यक्षमतेमुळे आणि दुर्लक्षामुळे भविष्यात अशा भयानक घटना वारंवार घडतच राहतील, अशी भीती आता बंडू धोत्रे यांनी व्यक्त केली आहे. वन विभाग अजून किती बळींची वाट पाहत आहे? असा संतप्त सवाल आता येथील जनता विचारत आहे.