चंद्रपूर:- लग्नाकार्यातील आनंदाच्या वातावरणाला वादाचे गालबोट लागले असून, किरकोळ कारणावरून झालेल्या भांडणात एका तरुणावर धारदार शस्त्राने हल्ला करण्यात आला आहे. ही घटना २५ एप्रिल रोजी रात्री १० वाजेच्या सुमारास चंद्रपूर शहरात घडली.
मिळालेल्या माहितीनुसार, फिर्यादी विजय नन्नेश्वर पगाडे (वय २७ वर्ष) हे प्रबुद्ध अलोने यांच्या बहिणीच्या हळदीच्या कार्यक्रमासाठी गेले होते. जेवण झाल्यानंतर सर्वजण नाचत असताना, आदित्य पेटकर नावाच्या तरुणाचा पाय विजय यांच्या पायावर पडला, ज्यामुळे विजय यांची चप्पल तुटली. विजय यांनी ही बाब आदित्यला बोलून दाखवली असता, दोघांमध्ये शाब्दिक चकमक झाली.
वाद वाढत गेल्याने आदित्य पेटकर आणि त्याच्या एका मित्राने विजय यांना मारहाण करण्यास सुरुवात केली. वादाचे रूपांतर हाणामारीत झाले. यावेळी आदित्यने आपल्याजवळील धारदार शस्त्र बाहेर काढले. हा हल्ला विजय यांच्यावर होणार होता, परंतु त्यांना वाचवण्यासाठी त्यांचा मित्र आकाश अऊंदेकर मध्यस्थी करायला आला. दुर्दैवाने, आदित्यने केलेला वार आकाशला लागल्याने तो जखमी झाला.
घटनेनंतर आदित्य पेटकर आणि त्याचा मित्र घटनास्थळावरून पसार झाले. जखमी आकाशला तातडीने चंद्रपूर शहर पोलीस ठाण्यात नेण्यात आले, जिथून पोलिसांनी त्याला उपचारासाठी जिल्हा सामान्य रुग्णालय येथे भरती केले आहे. सध्या आकाशवर उपचार सुरू असून, विजय पगाडे यांच्या तक्रारीवरून चंद्रपूर शहर पोलिसांनी तरुणांविरुद्ध गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरू आहे.


