Pombhurna News: स्मशानभूमीत रात्रीच्या वेळी 'अघोरी' विधीचा संशय?

Bhairav Diwase
२४ वर्षीय युवकाच्या अंत्यसंस्कारानंतर काही तासांतच राडा!

पोंभुर्णा:- पोंभुर्णा शहरातील २४ वर्षीय युवकाच्या अंत्यसंस्कारानंतर काही तासांतच सेल्लूर घाट स्मशानभूमीत घडलेल्या एका घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे. अंत्यविधी झालेल्या ठिकाणाजवळ रात्री काही व्यक्ती पूजाविधी करीत असल्याची माहिती मिळाल्यानंतर नातेवाईक व ग्रामस्थ घटनास्थळी पोहोचले. त्यानंतर अघोरी कृत्याचा संशय व्यक्त करत झालेल्या वादातून तिघांना मारहाण करण्यात आल्याची घटना उघडकीस आली आहे.


प्राप्त माहितीनुसार, शहरातील एका २४ वर्षीय युवकाचा अंत्यविधी २९ मे रोजी सेल्लूर घाटावरील पोंभूर्णा स्मशानभूमीत पार पडला. अंत्यसंस्कार आटोपल्यानंतर नातेवाईक घरी परतले. त्यानंतर रात्री सुमारे ८ वाजताच्या सुमारास स्मशानभूमी परिसरात काही व्यक्ती पूजा साहित्य घेऊन नदीपात्रात विधी करीत असल्याची माहिती कावळे कुटुंबीयांना मिळाली.


त्यामुळे काही नातेवाईक व नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली. याचवेळी अशोक शांतया पुष्पलवार (वय ५५, रा. पोंभुर्णा), सुरेश भाऊजी दिवसे (वय ५२ रा. चेक बल्लारपूर) आणि विनोद गोपीनाथ चिंताडे (वय ५१ रा. गोंडपिपरी) हे तिघे पोंभूर्णा स्मशानभूमी सेल्लूर घाटावरील नदीपात्रात पूजाविधी करीत होते. तेथे आलेल्या तीन अनोळखी युवकांनी संबंधितांकडे जाऊन ते अघोरी कृत्य करीत असल्याचा आरोप केला. यावरून दोन्ही बाजूंमध्ये शाब्दिक वाद झाला आणि त्याचे रूपांतर हाणामारीत झाले.


या मारहाणीत अशोक पुष्पलवार, सुरेश दिवसे आणि विनोद चिंताडे जखमी झाले. जखमींना तातडीने पोंभुर्णा ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. घटनेची माहिती मिळताच पोंभुर्णा पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला.याप्रकरणी अशोक पुष्पलवार यांनी दिलेल्या तक्रारीवरून पोंभुर्णा पोलिसांनी तीन अनोळखी युवकांविरुद्ध भारतीय न्याय संहितेच्या कलम ११८(१), १२५(२), ३५२, ३५१(२) आणि ३(५) अन्वये गुन्हा दाखल केला आहे.


दरम्यान, स्मशानभूमीत सुरू असलेल्या या पूजाविधीमागील नेमका उद्देश काय होता, याबाबत विविध चर्चांना उधाण आले आहे. काहींनी याचा संबंध कथित गुप्तधन शोधाशी जोडला आहे. मात्र, यासंदर्भात कोणतीही अधिकृत पुष्टी झालेली नसून पोलिसांकडून सर्व बाबींची तपासणी सुरू आहे. सेल्लूर घाटावरील या घटनेमुळे शहरात एकच खळबळ उडाली असून तपासाच्या निष्कर्षाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.