Tigers die in Chandrapur: विहिरीत पडून वाघाचा, तर उष्णतेने छाव्याचा मृत्यू

Bhairav Diwase
चंद्रपूर:- यंदाचा उन्हाळा वाघांच्या दृष्टीने जीवावर बेतणारा ठरत आहे. गेल्या चोवीस तासात एक वाघ आणि एक छावा मृत्युमुखी पडला. पाण्यासाठी वणवण भटकताना सिंदेवाही वनपरिक्षेत्रातील चारगाव परिसरात एका शेतातील विहिरीत पडून पट्टेदार वाघाचा मृत्यू झाला. शेतकरी पांडुरंग गजभिये हे नेहमीप्रमाणे आपल्या शेतावर गेले असता, त्यांना परिसरात तीव्र दुर्गंधी येत असल्याचे जाणवले. संशय आल्याने त्यांनी शेतातील विहिरीत डोकावून पाहिले तेव्हा तिथे त्यांना एका पट्टेदार वाघाचा मृतदेह तरंगताना आढळून आला. तीव्र उन्हामुळे पाण्यासाठी भटकताना हा वाघ विहिरीत पडला असावा, अशी शक्यता आहे.


तर दुसऱ्या एका घटनेत पळसगाव परिक्षेत्रात उष्णतेमुळे एका बछड्याचा मृत्यू झाला. मीरा नावाच्या वाघिणीला तीन बछडे होते. त्यातील एक तापमानाने मृत्युमुखी पडला. यावर्षी तापमानाचा वाघांवर फारच परिणाम होत असल्याचे दिसून येत आहे. आठ दिवसांपूर्वीच एका वाघिणीने चार महिलांना ठार केले होते. त्यानंतर अभ्यासकांनी, तीव्र उष्णतेमुळे वाघ चिडखोर होतात, असा निष्कर्ष मांडला होता. एकूणच काय, तर हा उन्हाळा वाघांच्या दृष्टीने अतिशय धोकादायक ठरू लागलाय.