Election News: मविआचे अधिकृत उमेदवार शैलेंद्र अग्रवाल उद्या भरणार विधानपरिषद उमेदवारी अर्ज!

Bhairav Diwase


चंद्रपूर:- महाराष्ट्र विधानपरिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर विदर्भातील चंद्रपूर जिल्ह्यात राजकीय घडामोडींना कमालीचा वेग आला आहे. चंद्रपूर-वर्धा-गडचिरोली स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघासाठी काँग्रेस आणि महाविकास आघाडीने आपली कंबर कसली असून, काँग्रेसचे उमेदवार शैलेंद्र अग्रवाल हे उद्या म्हणजेच सोमवारी आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. या निमित्ताने महाविकास आघाडीने चंद्रपुरात जोरदार शक्तिप्रदर्शनाची तयारी सुरू केली आहे.


काँग्रेस पक्षाकडून निवडणुकीची जोरदार तयारी सुरू झाली असून उद्या चंद्रपूर येथील जिल्हाधिकारी कार्यालयात शैलेंद्र अग्रवाल आपला उमेदवारी अर्ज सादर करतील. या ऐतिहासिक प्रसंगी चंद्रपूरच्या खासदार श्रीमती प्रतिभा धानोरकर, काँग्रेसचे विधिमंडळ पक्षनेते आमदार विजय वडेट्टीवार, जिल्हाध्यक्ष तथा माजी आमदार सुभाष धोटे, आणि जिल्हा शहर काँग्रेस अध्यक्ष शिवा राव पोलशेट्टी यांच्यासह महाविकास आघाडीतील सर्व प्रमुख घटक पक्षांचे नेते आणि पदाधिकारी प्रामुख्याने उपस्थित राहणार आहेत.


अर्ज दाखल करण्याच्या या प्रक्रियेदरम्यान स्थानिक स्वराज्य संस्थांमधील मतदारांशी थेट संवाद साधणे, पक्ष संघटन अधिक मजबूत करणे आणि महाविकास आघाडीमधील समन्वय आणखी दृढ करण्याच्या दृष्टीने एक विशेष चर्चा आणि संपर्क अभियानही राबवले जाणार आहे. आगामी निवडणुकीत विजय निश्चित करण्यासाठी मविआच्या सर्व घटक पक्षांतील नगरसेवक, पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांची एकजूट मजबूत करण्यावर नेत्यांचा भर असणार आहे.


या पार्श्वभूमीवर, महाविकास आघाडीची ताकद दाखवण्यासाठी आणि उमेदवाराला पाठबळ देण्यासाठी उद्या सकाळी ठीक १०:३० वाजता जनता महाविद्यालयाजवळील 'दि ग्रँड आयकॉन' हॉटेल, चंद्रपूर येथे मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे अधिकृत आवाहन काँग्रेस जिल्हाध्यक्ष माजी आमदार सुभाष धोटे यांनी सर्व नगरसेवक, पदाधिकारी, कार्यकर्ते आणि समर्थकांना केले आहे.