Ballarpur News: विसापूरात वाढत्या गुन्हेगारीमुळे नागरिक दहशतीखाली

Bhairav Diwase

भाजप युवा मोर्चाचे संदीप पोडे आक्रमक; सीसीटीव्ही बसवण्यासाठी दिले निवेदन

बल्लारपूर:- विसापूर गावात गेल्या काही दिवसांत वाढलेल्या गुन्हेगारीच्या आलेखावर आता ग्रामस्थ कमालीचे संतप्त झाले आहेत. "पुढचा एखादा खून होण्याची वाट न पाहता, गावात तात्काळ CCTV कॅमेरे बसवा," अशी आक्रमक आणि थेट मागणी भाजप युवा मोर्चा बल्लारपूर तालुक्याचे अध्यक्ष संदीप श्रीहरी पोडे आणि विसापूरच्या ग्रामस्थांनी केली आहे.


विसापूर परिसरात सध्या भीती आणि असुरक्षिततेचे सावट पसरले आहे. काही दिवसांपूर्वीच गावात एक मोठी चोरीची घटना घडली होती, आणि हा धक्का ओसरतो न ओसरतो तोच एका खूनाच्या घटनेने संपूर्ण गाव हादरून गेले. या लागोपाठ घडणाऱ्या गुन्हेगारी घटनांमुळे गावातील महिला, ज्येष्ठ नागरिक आणि मुलांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.


याच पार्श्वभूमीवर भाजप युवा मोर्चाचे संदीप पोडे यांच्या नेतृत्वात ग्रामस्थांनी विसापूर ग्रामपंचायत प्रशासनाला एक निवेदन सादर केले. या निवेदनात गावातील प्रत्येक मुख्य चौक, बाजारपेठ, शाळा परिसर आणि गावात येणाऱ्या-जाणाऱ्या मुख्य रस्त्यांवर आधुनिक CCTV कॅमेरे लावण्याची मागणी करण्यात आली आहे.


घटना घडल्यानंतर कारवाई करण्यापेक्षा, ती घडूच नये म्हणून प्रतिबंधात्मक उपाय करणे गरजेचे आहे. ग्रामपंचायतीने समोरचा खून होण्याची वाट पाहू नये, तात्काळ निधी मंजूर करून कॅमेरे बसवावेत.
संदीप श्रीहरी पोडे (अध्यक्ष, भाजप युवा मोर्चा, बल्लारपूर)


विसापूरची लोकसंख्या झपाट्याने वाढत आहे. बाहेरील लोकांची वर्दळही वाढली आहे, मात्र गावात पुरेशी सुरक्षा व्यवस्था नसल्याने गुन्हेगारांचे धाडस वाढले आहे. रात्रीच्या वेळी अनेक रस्ते अंधारात असतात, ज्यामुळे संशयास्पद हालचाली वाढतात. जर गावात सीसीटीव्ही कॅमेरे बसवले, तर चोरी, अवैध धंदे आणि गुन्हेगारीवर वचक बसेल, तसेच पोलिसांनाही तपासात मोठी मदत होईल.

विसापूरमधील या वाढत्या गुन्हेगारीमुळे लोकांमध्ये प्रचंड रोष आहे. आता नागरिकांच्या या रास्त मागणीवर आणि सुरक्षेच्या प्रश्नावर विसापूर ग्रामपंचायत प्रशासन तातडीने काय पाऊल उचलते, की आणखी एखाद्या मोठ्या घटनेची वाट पाहते? याकडे संपूर्ण गावाचे लक्ष लागले आहे.