Tiger Attack: चंद्रपूर जिल्ह्यात वाघाची दहशत कायम; मोटेगावातील व्यक्तीचा वाघाच्या हल्ल्यात मृत्यू!


चिमूर:- चिमूर तालुक्यात वाघाच्या हल्ल्यांचे सत्र थांबायचे नाव घेत नाहीये. आज पुन्हा एकदा वाघाने एका निष्पाप मानवाचा बळी घेतला असून, मोटेगाव परिसरात यामुळे प्रचंड भीतीचे आणि दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

चिमूर तालुक्यातील मोटेगाव येथील रहिवासी असलेले दिलीप नन्नावरे (वय ४५ वर्षे) हे नेहमीप्रमाणे रविवारी सकाळी आपल्या बकऱ्या चरण्यासाठी जंगलाच्या दिशेने गेले होते. दुपारच्या सुमारास त्यांच्या बकऱ्या तर सुखरूप घरी परतल्या, मात्र दिलीप नन्नावरे घरी परतले नाहीत. यामुळे कुटुंबीयांच्या मनात शंकेची पाल चुकचुकली.

दिलीप घरी न परतल्याने गावकरी आणि नातेवाईकांनी तातडीने पहाडी जंगल परिसरात त्यांचा शोध घेण्यास सुरुवात केली. शोधमोहीम सुरू असतानाच, जंगलात दिलीप नन्नावरे यांचा मृतदेह आढळून आला. या घटनेमुळे मोटेगावसह संपूर्ण चिमूर तालुक्यात खळबळ उडाली आहे.