Chandrapur News: छत्रपती शिवरायांच्या पुतळ्याचे भूमिपूजन अन् मनपाचे ४ कर्मचारी निलंबित!

Bhairav Diwase
नेमके प्रकरण काय?
चंद्रपूर:- चंद्रपूर महानगरपालिकेतून एक मोठी आणि खळबळजनक बातमी समोर येत आहे. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळा उभारणीच्या भूमिपूजन कार्यक्रमात हलगर्जीपणा दाखवणाऱ्या चार कर्मचाऱ्यांवर महापालिका आयुक्तांनी निलंबनाची कुऱ्हाड चालवली आहे.


१ मे रोजी महाराष्ट्र दिनाचे औचित्य साधून गिरनार चौक येथे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळा उभारणीचा भव्य भूमिपूजन सोहळा पार पडला. मात्र, या ऐतिहासिक सोहळ्यात प्रोटोकॉल आणि नियोजनाचा पुरता बोजवारा उडाल्याचे दिसून आले.


या कार्यक्रमात कर्तव्यात कसूर केल्याचा ठपका ठेवत आयुक्त अकनुरी नरेश यांनी अत्यंत कडक पाऊल उचलले आहे. निलंबित करण्यात आलेल्या कर्मचाऱ्यांमध्ये युधिष्ठिर रेच (जनसंपर्क अधिकारी), सिद्दिकी अहमद (भंडारप्रमुख) तर याच दिवशी ध्वजारोहण कार्यक्रमासाठी कार्यालय वेळेत उघडले नसल्याच्या कारणाने महापौर व उपमहापौर यांच्या कक्षावरील दोन शिपाई त्यात जेजीलवार, बोते यांचा समावेश आहे. अशा चौघांवर निलंबनाची कारवाई करण्यात आल्याने महापालिका वर्तुळात खळबळ उडाली आहे.


मिळालेल्या माहितीनुसार, एवढ्या मोठ्या सोहळ्यात उपस्थित असलेल्या राजकीय नेत्यांना आणि नगरसेवकांना सन्मानाचे फेटे बांधण्यात आले नाहीत. इतकेच नाही तर कार्यक्रमस्थळी आवश्यक बॅनर लावण्यात आले नव्हते आणि निमंत्रण पत्रिकांचे वाटपही वेळेवर झाले नसल्याचे समोर आले आहे. तर १ मे रोजी महापालिकेत महापौर संगीता खांडेकर आणि उपमहापौर प्रशांत दानव हे ध्वजारोहणासाठी आले असता शिपायांनी सकाळी कार्यालय उघडले नव्हते. त्यामुळे खांडेकर यांच्या कार्यालयातील शिपाई जेजीलवार आणि उपमहापौरांच्या कार्यालयाचे शिपाई बोते यांचे निलंबन करण्यात आले आहे. 

एका ऐतिहासिक सोहळ्यातील ही नियोजनाची त्रुटी प्रशासनाच्या अंगलट आली असून, या कारवाईमुळे आता महापालिका वर्तुळात प्रचंड खळबळ उडाली आहे. कामात कसूर करणाऱ्यांना आयुक्त माफी देणार नाहीत, असाच स्पष्ट संदेश या निमित्ताने देण्यात आला आहे.