गडचिरोली:- गडचिरोलीवरून उमरखेडकडे जाणाऱ्या राज्य परिवहन महामंडळाच्या (MSRTC) एसटी बसला आज सकाळी मोठा अपघात झाला आहे. चालकाचे नियंत्रण सुटल्याने ही भरधाव बस थेट रस्त्याच्या कडेला जाऊन उलटली. या अपघातात ५० प्रवासी जखमी झाले असून एका वृद्ध प्रवाशाचा जागीच दुर्दैवी मृत्यू झाला आहे, तर एका लहान मुलीची प्रकृती अत्यंत चिंताजनक आहे.
मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, ही एसटी बस आज सकाळी नेहमीप्रमाणे गडचिरोली डेपोमधून उमरखेडच्या दिशेने जाण्यासाठी निघाली होती. बसमध्ये प्रवाशांची मोठी गर्दी होती. मात्र, गडचिरोली जवळील मुरखळा गावाच्या परिसरात पोहोचताच चालकाचे बसवरील नियंत्रण अचानक सुटले आणि बस रस्त्याच्या कडेला जाऊन पलटी झाली. बस उलटताच प्रवाशांमध्ये एकच आक्रोश आणि किंकाळ्या ऐकायला आल्या.
या भीषण अपघातामध्ये ख्वाजा शहाबुद्दीन या ज्येष्ठ नागरिकाचा जागीच मृत्यू झाला आहे. तर एका लहान मुलीची प्रकृती अतिशय चिंताजनक असून तिच्यावर सध्या अतिदक्षता विभागात (ICU) उपचार सुरू आहेत.
अपघाताची माहिती मिळताच स्थानिक नागरिकांनी आणि प्रशासनाने तातडीने घटनास्थळी धाव घेत बचावकार्य सुरू केले. बसमध्ये अडकलेल्या प्रवाशांना तात्काळ बाहेर काढण्यात आले. जखमी झालेल्या सर्व प्रवाशांना रुग्णवाहिकेद्वारे गडचिरोलीच्या जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या घटनेची माहिती मिळताच पोलीस दलही घटनास्थळी दाखल झाले असून, अपघाताच्या अचूक कारणांचा शोध पोलिसांकडून घेतला जात आहे.


