चंद्रपूर:- स्वतःला पंतप्रधान घोषित करणाऱ्या महादेव गुलाब आसेकर या व्यक्तीवर वरोरा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्याने आपल्या फोरच्युनर वाहनावर ‘पीएम’ आणि ‘पंतप्रधान भारत सरकार’ असे स्टीकर लावले होते. या वाहनाने २८ फेब्रुवारी रोजी सायंकाळी ६ वाजताच्या सुमारास शहरातील रत्नमाला चौकात वाहतूक नियंत्रण बॅरिकेड तोडून पलायन केल्याची घटना घडली. सध्या तो फरार असून, पोलिसांनी त्याचे वाहन जप्त केले आहे.
वाहतूक पोलिसांनी रत्नमाला चौकात चारचाकी वाहन चालकाला थांबण्याचे संकेत दिले होते. त्यावेळी (एमएच ३४ सीजे ९२१५ )या क्रमांकाचे वाहन वेगाने आले आणि थांबले. यावेळी या वाहनाच्या चाकातील हवा सोडण्यात आली. यानंतर वाहतूक कर्मचाऱ्यांनी चालकाला खाली उतरण्यास सांगितले. परंतु, त्याने जागेवरूनच वेग वाढवून बॅरिकेडला जोरदार धडक देत वाहनासह पलायन केले. वाहन बोर्डा गावात सोडून महादेव गुलाब आसेकर हे पायदळ पसार झाले. रात्री वरोरा पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेज तपासून वाहनाचा शोध घेत ते जप्त करून पोलिस ठाण्यात ठेवले.
या प्रकारामुळे नागरिकांच्या जीविताला धोका निर्माण झाला असून, वाहनचालकाने मुद्दामहून वेग वाढवून बॅरिकेड तोडले आणि पळ काढला. या प्रकरणी संदीप पांडुरंग अनेराव यांनी वरोरा पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली. तक्रारीवरून महादेव गुलाब आसेकर यांच्यावर भारत सरकारच्या पीएम शब्दाचा गैरवापर, सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान, वाहतूक नियमांचे उल्लंघन आणि इतर कलमांनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी त्याचा शोध सुरू केला असून, लवकरच अटक होईल, अशी माहिती सूत्रांनी दिली.
महादेव आसेकर हे यापूर्वीही स्वतःला ‘स्व नियुक्त पंतप्रधान’ म्हणून घोषित करून चर्चेत आले होते. त्यांनी आपल्या वाहनावर ‘पंतप्रधान भारत सरकार’ असे ठळक स्टीकर लावले होते. तसेच संबंधित अधिकाऱ्यांकडे सुरक्षा सुविधांची मागणीही केली होती. या घटनेने स्थानिक पातळीवर खळबळ उडाली असून, अशा प्रकारे सरकारी चिन्हांचा गैरवापर करणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याची मागणी होत आहे. तपास सुरू असून सर्व पुरावे गोळा केले जात असल्याचे पोलिसांनी सांगितले.

