Chandrapur News: चंद्रपुरात रेती घाटावरून रक्ताचा सडा

Bhairav Diwase
दोन गटांच्या वादात एकाचा मृत्यू
चंद्रपूर:- रेतीचे साम्राज्य आणि वर्चस्वाचा वाद आता रक्ताच्या थारोळ्यापर्यंत पोहोचला आहे. चंद्रपूर जिल्ह्याच्या वरोरा तालुक्यातून एक हादरवून टाकणारी बातमी समोर येत आहे. रेती उत्खनन आणि सीमांकनावरून दोन गट आमनेसामने आले आणि या हाणामारीत एकाला आपला जीव गमवावा लागला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, मृतकाचे नाव भारत नागपाल, वय ४० वर्ष असून तो वर्धा जिल्ह्यातील पुलगावचा रहिवासी होता. ही घटना वरोरा तालुक्यातील वर्धा नदीच्या तीरावरील बामुर्डा घाटावर घडली. वर्धा जिल्ह्यातील हिंगणघाट तालुक्यात असलेल्या ढिवरी-पिपर येथील रेती घाटाचा शासनाकडून लिलाव झाला होता. मात्र, उत्खनन आणि सीमेच्या वादावरून वर्ध्यातीलच दोन गट एकमेकांना भिडले.


काल रात्री हा वाद इतका विकोपाला गेला की दोन्ही गटांतील लोकांनी एकमेकांवर प्राणघातक हल्ला चढवला. हाणामारी करत हे लोक वर्धा जिल्ह्याची सीमा ओलांडून चंद्रपूर जिल्ह्याच्या हद्दीत शिरले. याच ठिकाणी भारत नागपालचा मृत्यू झाला, तर इतर दोन जण गंभीर जखमी झाले आहेत.


घटनेची गांभीर्य लक्षात घेता वरोरा पोलिसांनी तातडीने गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणी वर्धा जिल्ह्यातील वडनेर पोलिसांनी तीन संशयितांना अटक केली होती, ज्यांना आता वरोरा पोलिसांनी आपल्या ताब्यात घेतले आहे. मृतदेह शवविच्छेदनासाठी हिंगणघाट येथे पाठवण्यात आला असून, या घटनेमुळे परिसरात तणावाचे वातावरण आहे.