सोमवारी निकाल, मिरवणुका, फटाके फोडणे, गुलाल उधळण्यावर बंदी!

Bhairav Diwase
Bhairav Diwase. Jan 17, 2021
चंद्रपूर:- राज्यात नुकत्याच पार पडलेल्या ग्रामपंचायत निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर आता त्या त्या जिल्ह्यातील प्रशासन सज्ज झालं आहे. या निवडणुकांसाठी मतदान पार पडलं असून त्यासाठी उद्या म्हणजेच १८ जानेवारी २०२१ रोजी मतमोजणी होणार आहे. दुपारपर्यंत अनेक ग्रामपंचायतींचे निकाल देखील हाती येतील. मात्र, यानंतर उमेदवारांनी किंवा त्यांच्या कार्यकर्त्यांनी कोरोना संदर्भातल्या नियमावलीचं उल्लंघन करू नये म्हणून स्थानिक प्रशासन सज्ज झालं आहे. अनेक जिल्ह्यांमध्ये स्थानिक प्रशासनाने निकालांच्या पार्श्वभूमीवर कडक बंदोबस्त लावण्यात आला आहे. पुणे, नाशिक, औरंगाबाद, सोलापूर, नागपूर, चंद्रपुर या जिल्ह्यांमध्ये प्रशासन सतर्क झालं असून नियमावली जारी करण्यात आल्या आहेत. 

           ✌✌✌✌✌✌✌✌
चंद्रपूर जिल्ह्यातील ६२९ ग्रामपंचायतीच्या निवडणुका १५ जानेवारी रोजी पार पडल्या. यासाठी प्रशासनाने तयारी पूर्ण केली. ५ हजार १५९ ग्रामपंचायत सदस्यांची निवड करण्यात येणार आहे. निवडणुकांचे निकाल आल्यानंतर विजयी मिरवणुका काढण्यावर बंदी घालण्यात आली आहे. तसेच, यानंतर रॅली काढणे, फटाके फोडणे, गुलाल उधळण्यावर बंदी घालण्यात आली आहे. त्यामुळे अशा प्रकारे नियमांचं उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाई करण्याचे देखील निर्देश देण्यात आले आहेत. या पार्श्वभूमीवर ग्रामपंचायत निवडणुकांच्या निकालांसाठी स्थानिक प्रशासन आणि पोलीस यंत्रणा देखील सतर्क झाली आहे.