पाथरी गावाने केलेले काम "गाव करी ते राव न करी" या श्रेणीत मोडणारे ठरले.

Bhairav Diwase
अंदाजे 10 हजार लोकसंख्येच्या पाथरी ग्रामपंचायतीने स्वबळावर 50 खाटांचे कोविड केंद्र उभारले.
Bhairav Diwase. May 24, 2021

सावली:- चंद्रपूर जिल्ह्यात शहरी भागासह दुसऱ्या लाटेत ग्रामीण भाग अधिक प्रभावित झाला. कोरोना बाधीत रुग्णालयात जाण्यासाठी संकोच करत होते. केंद्रात आढळणाऱ्या गैरसोयी यातील प्रमुख कारण असल्याचे लक्षात आल्यावर ग्रामीण भागातील नागरिकांनी उपचार केंद्र उभारणीत एकजूट दाखविल्याचे बघायला मिळत आहे. पाथरी गावाने केलेले काम 'गाव करी ते राव न करी' या श्रेणीत मोडणारे ठरले आहे.
अंदाजे 10 हजार लोकसंख्येच्या पाथरी ग्रामपंचायतीने स्वबळावर 50 खाटांचे कोविड केंद्र उभारून इतरांपुढे आदर्श निर्माण केलाय. आपल्या आसपास वाढणारे कोविड रुग्ण ग्रामस्थांना अस्वस्थ करत होते. सावली तालुक्यात गडचिरोली जिल्ह्याच्या सीमेवर असलेले एका टोकावरचे पाथरी गाव वाढत्या रुग्णसंख्येने हादरले होते. असे असले तरी तालुक्याच्या ठिकाणी उपचार केंद्रात जाण्यास नकार दिला जात होता. गावातील प्राथमिक आरोग्य केंद्राची तोकडी क्षमता लक्षात घेता तातडीने याबाबत निर्णय घेणे गरजेचे होते.
ग्रामस्थ- ग्रामपंचायत- गावातील युवक यांनी एकत्र येत अध्यापन बंद असलेल्या जिल्हा परिषद शाळेच्या खोल्यांमध्ये कोविड उपचार केंद्र उभारण्याचे ठरविले. गावाने मनात आणल्यावर खाटा-गाद्या-ऑक्सिजन concentrator आणि इतर वैद्यकीय सामुग्रीची आपसूक सोय झाली. प्राथमिक आरोग्य केंद्रातील शासकीय सेवेतील डॉक्टरांनी यातील उपचारासाठी सहकार्य करण्याचे ठरविले आणि उभे झाले 50 खाटांचे कोविड उपचार केंद्र. 
दुसऱ्या लाटेत रुग्णवाढ झाली असली तरी कोविड केंद्रे कमी असल्याने उपचारात होणारी हयगय केवळ समाजाच्या निर्धारातून समर्थपणे दूर झाली. या केंद्रातून केवळ 20 दिवसात 40 बाधीत समाधानी होत घरी गेले. कोरोनाची दुसरी लाट ओसरत आहे. मात्र तिसरी लाट पुढ्यात आहे. पाथरी सारख्या गावाने दाखविलेला एकजुटीचा मार्ग राज्यातील इतर ग्रामपंचायतींसाठी प्रेरणादायक ठरला आहे.