Top News

समाजभान जपणारा कार्यकर्ता ॲड.दीपक चटप.

लेखक:- अविनाश पोईनकर

हल्ली स्वत:ला सामाजिक कार्यकर्ते समजणारे गल्लीबोळात सापडतात. जणू काही मातीत पिक कमी आणि तणकट जास्त उगवून आल्यासारखा भास होतो. कधी कधी सामाजिक कार्यकर्त्यांने केलेली विधायक कामे आठवत नाही अन् कर्तुत्वाचा तर पत्ताच लागत नाही. कार्यकर्ता हा शब्द राजकारणात तर शिवी हासडल्यासारखा वाटतो. सतत समाजाच्या तळाशी पोहचून प्रामाणिक काम करणारे सच्चे कार्यकर्ते यामुळेच कदाचित पुढे येण्यास धजावत नाही. जे कसलीही पर्वा न करता कर्तुत्वाने पुढे येवून झोकून काम करतात, ते काळाशी सुसंगत असतात. तन-मन-धन अर्पण करुन प्रामाणिकपणे समाजाच्या हितासाठी जो सातत्याने कार्यतत्पर असतो, तो कार्यकर्ता. समाजात नव्या पिढीत कार्यकर्ते निर्माण करु पाहणारा व समाजासाठी अगदी कमी वयात विविध क्षेत्रात राज्य-राष्ट्रीय स्तरावर विधायक काम करणा-या अश्याच एका धडपड्या युवा कार्यकर्त्याच्या कर्तुत्वाची ही गोष्ट!

अॅड.दीपक यादवराव चटप असे या कार्यकर्त्यांचे नाव. कोरपना तालुक्यातील गडचांदूर येथील शेतकरी कुटुंबात २७ जून १९९७ रोजी दीपकचा जन्म. आज या कार्यकर्त्याचा २४ वा वाढदिवस. अवघ्या २४ वर्षाच्या दीपकने विविध क्षेत्रात घेतलेली भरारी तरुणांना प्रेरणादायी आणि थक्क करणारी आहे. ग्रामीण भागात महाविद्यालयीन शिक्षणानंतर दीपकने पुणे येथील आय.एल.एस या देशातील नामांकित विधी महाविद्यालयातून कायद्याच्या पदवीचे शिक्षण पुर्ण केले. राजूरा, कोरपना, जिवती, गोंडपिपरी या गोंडवन परिसरात दीपकने केलेले काम महत्त्वपुर्ण आहे. ज्या वयात तरुणांना फारशी मिसरुड येत नाही त्याच वयात अॅड.दीपक चटप हा तरुण बालपणापासूनच समाजासाठी जबाबदारीने सेवाव्रतासारखा काम करतो आहे.

अॅड.दीपक चटप हा तरुण सामाजिक, सांस्कृतिक, राजकीय व विधी क्षेत्रात सक्रिय आहे. उत्कृष्ट कवी, लेखक, वक्ता व सामाजिक प्रश्नांचा अभ्यासक, विश्लेषक म्हणून सुपरिचित आहे. ॲड.दीपकने चटप मुंबई उच्च न्यायालयात विधी सहाय्यक म्हणून कार्य केले. उच्चशिक्षणासाठी परदेशात त्याची निवड झाली. मात्र कोरोनामुळे तो सध्या चंद्रपूर जिल्ह्यात सक्रिय आहे. दीपकने राज्यभरात विविध सामाजिक चळवळीत सक्रिय राहून तळागाळातील लोकांना न्याय मिळवून दिला. शेतकरी चळवळीतील या युवकाचं योगदान महत्त्वपूर्ण आहे. समाजाला प्रेरणादायी आहे.

वयाच्या सोळाव्या वर्षी दीपकने सामाजिक कार्यकर्ते पद्मश्री अन्ना हजारे यांच्या समर्थनार्थ जनलोकपाल विधेयकासाठी गडचांदूरात आंदोलन केले. शेतक-यांना किमान हमीभाव मिळावा, विदर्भ राज्य व्हावे यासाठी पानफुल आंदोलनाचे नेतृत्व केले. शेतकरी चळवळीत जेल भरो, रेल रोको, सविनय कायदेभंग अशा विविध आंदोलनात दीपकचा विद्यार्थी दशेतील सहभाग महत्त्वाचा ठरला. पुणे येथे कायद्याचे शिक्षण घेत असतांनाच दीपकने महाराष्ट्राच्या विधीमंडळात पावसाळी, हिवाळी व अर्थसंकल्पीय अधिवेशनात २०१६-१७ साली माजी अर्थमंत्री व विद्यमान मंत्री जयंत पाटील यांच्याकडे थेट विधानसभेत इंटर्नशिप केली. ना.जयंत पाटील यांच्या माध्यमातून राज्यातील विविध विषयांवरील प्रश्न विधीमंडळात मांडले.

अॅड.दीपकचं साहित्य व सांस्कृतिक क्षेत्रातील कर्तुत्व उल्लेखनीय आहे. 'लढण्याची वेळ आलीय!' हा दीपकचा प्रसिद्ध कवितासंग्रह. वयाच्या विशीत दीपकच्या कवितासंग्रहाचं प्रकाशन अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष, प्रसिद्ध साहित्यिक, समीक्षक श्रीपाल सबनीस यांनी केले. नव्या कृषी कायद्याची सोप्या भाषेत उकल करणारे 'कृषी कायदे : चिकित्सा व न्यायाधिकरणाची गरज' हे नुकतेच प्रकाशित झालेले त्याचे पुस्तक चर्चेत आहे. राजूरा, कोरपना, जिवती, गोंडपिपरी परिसरात अक्षर साहित्य कला प्रतिष्ठानची सुरुवात अकरा वर्षांपूर्वी झाली. दीपक तेव्हा तेरा वर्षाचा होता. त्यातही दीपकचा सहभाग होता. दर दोन वर्षांनी या प्रतिष्ठानतर्फे राज्यस्तरीय अभंग साहित्य संमेलन घेण्यात येते. कविसंमेलने, चर्चासत्र, पुस्तक प्रकाशन, विविध क्षेत्रातील कार्यकर्त्यांना पुरस्कार वितरण आदी कार्यक्रमाचं आयोजन करण्यात येते. यातही दीपकचा पुढाकार सक्रिय असतो‌. दीपक अनेक वृत्तपत्रे, मासिकांना अजूनही सातत्यपुर्ण सामाजिक प्रश्नांवरील वैचारिक मंथन लिहीतो. दीपकमुळे आज परिसरात साहित्य व सांस्कृतिक क्षेत्रात काम करणारी बरीच तरुण मंडळी पुढे आली. लिहीती झाली. अनेकांसाठी या क्षेत्रातही दीपक प्रेरणा ठरला.

दीपकचा शेती-माती चळवळीशी फार जिव्हाळ्याचा संबंध, अनेकांना न्याय मागण्यासाठी स्वतंत्र न्यायालये आहेत. शेतक-यांवर इतका अन्याय होत असतांना देखील त्यांना न्याय मागण्यासाठी स्वतंत्र न्यायालय का नाही ? या अस्वस्थ करणा-या प्रश्नाच्या शोधातच प्रसिद्ध मानवाधिकार कार्यकर्ते, विधिज्ञ अॅड.असिम सरोदे यांच्या मार्गदर्शनात 'राष्ट्रीय कृषी न्यायाधिकरण कायदा-२०१८' च्या मसुदा समीतीत अॅड.दीपकने योगदान दिले. खा.राजीव सातव यांनी हे अशासकीय विधेयक लोकसभेत मांडले. मुंबई येथील हाजी अली दर्गाह लगत अरबी समुद्रात होणा-या प्रदुषणासंदर्भात राष्ट्रीय पर्यावरण न्यायाधिकरणात जनहित याचिका दीपकने दाखल केली. यात राज्य सरकारचे पर्यावरण विभाग व हाजी अली दर्गाह ट्रष्ट हे प्रतिवादी होते. दीपकच्या जनहित याचिकेची तात्काळ दखल घेवून तेथील अरबी समुद्रातील पाण्याचे होणारे प्रदुषण यावर शासन व ट्रष्टने आळा घातला.

चिथावणीखोर व वादग्रस्त वक्तव्याबाबत खासदार साक्षी महाराजांच्या विरोधात पोलीस स्टेशन डेक्कन जिमखाना येथे दीपकने कायद्याचे शिक्षण घेत असतांनाच तक्रार दाखल करुन आंदोलन केले. या तक्रारीचा मूद्दा स्वराज इंडियाचे संस्थापक योगेंद्र यादव व प्रख्यात विधिज्ञ अॅड.प्रशांत भुषण यांनी दिल्लीत उचलून दखल घेतली. मागीलवर्षी धर्मा पाटील या अन्यायग्रस्त शेतक-याने मंत्रालयात विष घेवून आत्महत्या केली होती. अॅड.दीपकने शेतक-यांची बाजू घेवून थेट शासनाच्या व मंत्री महोदयांच्या विरुद्ध केस दाखल करुन लढा दिला. नुकताच या प्रकरणाचा निकाल शेतकरी कुटुंबाच्या बाजूने लागला असून अॅड.दीपक चटप या युवा विधी अभ्यासकामुळे कुटुंबास न्याय मिळाला.

अॅड.दीपक चटप या तरुणाने युवक चळवळीत स्वत:ला झोकून दिले. पद्मश्री डॉ.अभय बंग व राणी बंग यांच्या 'निर्माण' या राज्यभरातील निवडक युवकांच्या शिबीरात दीपकची निवड झाली. त्यातून सामाजिक प्रश्नांवर दीपक अभ्यासपुर्ण काम करायला पुढे सरसावला. पुण्यात परिवर्तनवादी युवा मंचाची १५० युवकांसोबत स्थापना केली. याद्वारे न्यायिक सक्रियता कार्यशाळेचे आयोजन केले. यात न्यायमुर्ती बी.जी.कोळसे पाटील यांची उपस्थिती होती. राम-रहीम प्रचार हिंसाचार प्रकरणी निषेध सभा दीपकने पुढाकार घेवून घेतल्या. 'मिळुन सा-याजनी' च्या संपादक स्व.डाॅ.विद्या बाळ, सामाजिक कार्यकर्ते डॉ.विश्वंभर चौधरी, विधिज्ञ अॅड.असिम सरोदे, शेतकरी नेते व माजी आमदार एड.वामनराव चटप यांच्या वैचारिक पाठबळात दीपकची कायद्याच्या शिक्षणात कृतीयुक्त जडणघडण झाली. मुंबईत खा.सुप्रिया सुळे यांच्या अध्यक्षतेखाली २०१७ च्या राज्य युवा धोरण चर्चासत्रात दीपकने विदर्भाचे प्रतिनिधीत्व केले‌. 'थिंक इंडिया' या विधी परिसंवादात दीपकने वक्ता म्हणून युवकांविषयी भुमीका विषद केली. विदर्भ राज्य युवा केंद्रिय समीतीत सक्रीय राहून यवतमाळात २०१५ साली वैदर्भीय युवक मेळाव्याचे यशस्वी आयोजन दीपकने केले. चंद्रपूर जिल्हा दारूबंदी नंतर नांदाफाटा येथे युवक, कामगार दारूमुक्ती मेळाव्याच्या यशस्वी आयोजनात दीपकचा खारीचा वाटा होता. अॅड.पारोमीता गोस्वामी, अर्थ विश्लेषक श्रीनिवास खांदेवाले यांची यात उपस्थिती होती. विविध महाविद्यालयात, गावात विधी व सामाजिक विषयांवर अॅड.दीपक वक्ता म्हणून सक्रियतेने अनेकांना मार्गदर्शन करतो आहे.

दोन वर्षांपूर्वी गडचिरोली जिल्ह्यातील भामरागड येथे मोठी पुर परिस्थिती होती. महिनाभर जगाशी येथील नागरिकांचा संपर्क तुटलेला होता. आदिवासी लोकांच्या वेदना व परिस्थिती जाणून दीपकने मित्रमंडळींच्या सहकार्याने जवळपास आठ ते दहा लाखांची समाजमाध्यमातून लोकवर्गणी करुन पुर परिस्थितीत अडकून पडलेल्या लोकांना जिवनावश्यक वस्तू व मदतसेवा पुरवली. नुकतेच लाॅकडाऊनच्या काळात अॅड.दीपक हा तरुण गावाकडे असतांना जिवती तालुक्यातील कोलाम आदीवासी समुदायाच्या वेदना बघून अस्वस्थ झाला. दीपकने कोलाम विकास फाउंडेशन व पाथ फाउंडेशनच्या सहकार्याने लाखो रुपयांची मदत गोळा करुन १३०० कुटुंबांना अन्नधान्याची किट पोहचवून त्यांच्या जगण्याला आधार व दिलासा दिला. मागील वर्षी कोरपना तालुक्यातील एकुण ६२ कुपोषित बालकांसाठी कुपोषणमुक्त अभियान राबवून पोषण आहार पुरवठा केला. सध्या चंद्रपूरात ५०० कंत्राटी आरोग्य कर्मचा-यांचे डेरा आंदोलन सुरु आहे. सहा महिन्यांपासून या कोरोना योद्ध्यांना वेतन नाही. त्यांच्या या प्रश्नांवर केवळ १ रुपया नाममात्र शुल्क घेत दीपकने कायदेशीर मानवाधिकार आयोगात तक्रार दाखल करुन लढा उभारला. समाजसेवक डाॅ.गिरीधरभाऊ काळे सामाजिक प्रतिष्ठानच्या माध्यमाने दरवर्षी रक्तदान शिबीर, वृक्षारोपण, गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार, स्पर्धा परिक्षा मार्गदर्शन, राज्यातल्या सामाजिक कार्यकर्त्यांना जीवन गौरव पुरस्कार सोहळा आदी उपक्रमात अॅड.दीपक चटप या तरुणाचा सक्रीय सहभाग असतो.

अॅड.दीपकच्या कर्तुत्वाला बालवयात व तरुणावस्थेत विविध स्तरावर सन्मानित करण्यात आले. धनोजे कुणबी समाजाच्या वतीने समाजगौरव पुरस्कार, पुणे विद्यापीठात परिवर्तन युवा पुरस्कार, जगतगुरु तुकोबाराय साहित्य पुरस्कार, अक्षर कार्यकर्ता पुरस्कार, तालुका, जिल्हा व राज्यस्तरावरील वक्तृत्व व वादविवाद स्पर्धेतील विविध पुरस्काराने दीपकचा गौरव झाला आहे.

अॅड.दीपक चटप हा वयाने जरी लहान असला तरी समाजात कार्यकर्ता म्हणून कुठेच कमी पडत नाही. सामाजिक तळमळ मनात असली की माणुस आपोआप काम करतो, त्यातीलच एक दीपक आहे. अनेक लोकांच्या आयुष्यात तो तरुणावस्थेतच 'दीपक' झाला आहे‌. प्रचंड वाचन, सातत्यपुर्ण अभ्यास, दांडगा लोकसंपर्क, वक्तृत्व, कर्तुत्व व नेतृत्व यातून अॅड.दीपक चटप या तरुणाचे व्यक्तीमत्व जबाबदारीने बहरत आहे. अल्पावधितच त्याच्या कामाने परिसरात एक आश्वासक विधीज्ञ म्हणून अॅड.दीपक चटप हे नाव सर्वार्थाने तळागाळातील लोकांच्या मनामनात सुगंधित होवून रुजले आहे.

अविनाश पोईनकर,
बिबी, चंद्रपूर
संपर्क : ७३८५८६६०५९
-avinash.poinkar@gmail.com
===============

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने