Click Here...👇👇👇

सासुरवाडीला आलेल्या जावयाची विष पिऊन आत्महत्या #suicide

Bhairav Diwase
1 minute read

चामोर्शी:- पत्नीला आणायला सासुरवाडीला आलेल्या जावयाने विष पिऊन आत्महत्या केल्याची घटना आष्टीत मंगळवारी (दि. ३१) घडली. योगेश आकाराम बन्सोड (वय २४, रा. इंदिरा नगर, नागपूर) असे मृत जावयाचे नाव आहे.
ध्यानीमनी नसताना घडलेल्या या प्रकाराने सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला असून, या आत्महत्येमागील गूढ उकलण्याचे आव्हान पोलिसांपुढे निर्माण झाले आहे.
योगेश बन्सोड हे ३० मे रोजी सायंकाळी सहा वाजताच्या दरम्यान आष्टी येथील त्यांचे सासरे धनराज देठे यांच्या घरी पत्नी स्नेहा हिला स्वगृही नागपूरला नेण्यासाठी आले होते. सर्वजण झोपी गेल्यानंतर पहाटे चार वाजताच्या सुमारास जावई उलटी करीत असल्याचा आवाज आल्याने सासू सुमित्रा देठे खाली आल्या. त्यांनी विचारणा केली असता जावयांनी विषयुक्त औषधी घेतल्याचे सांगितले. त्यांची प्रकृती गंभीर झाल्याने त्यांना ग्रामीण रुग्णालय आष्टी येथे उपचारासाठी दाखल करण्यात आले. डॉक्टरांनी त्यांना बोलते करण्याचा प्रयत्न केला असता, मी पानठेल्यातून पुडी घेतली व खाल्ली असे उत्तर योगेश बन्सोड यांनी दिले. उपचार सुरू असतानाच त्यांची प्राणज्योत मावळली. यावरून योगेशने आत्महत्येचा निर्णय आधीच घेतला होता का? त्यामागील कारण काय? असे प्रश्न चर्चेचा विषय झाले आहेत.
आष्टी पोलिसांनी घटनेची नोंद केली असून, आत्महत्येचे नेमके कारण काय, याचा तपास सुरू केला आहे.