माजी अर्थमंत्री आ. सुधीर मुनगंटीवार यांच्या पुढाकाराचे फलीत
मुंबई:- माजी अर्थमंत्री आ. सुधीर मुनगंटीवार यांच्या पुढाकाराने उन्हाळी हंगामातील धान खरेदीचे उदि्दष्ट वाढविण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे. शासनाच्या अन्न व नागरी पुरवठा विभागाच्या सहसचिव श्रीमती चारूशिला तांबेकर यांनी दिनांक ३ जुलै २०२२ रोजी महाराष्ट्र राज्य को-ऑपरेटीव्ह मार्केटींग फेडरेशन मुंबई तसेच व्यवस्थापकीय संचालक महाराष्ट्र राज्य सहकारी आदिवासी विकास महामंडळ मर्यादीत नाशिक यांना निर्देश दिले आहे.
उन्हाळी हंगामातील धान खरेदीची उदि्दष्ट त्वरीत वाढवावे आणि धान उत्पादक शेतक-यांना दिल्यासा द्यावा या मागणीसाठी आ. सुधीर मुनगंटीवार यांनी सातत्याने शासनाशी पत्रव्यवहार व पाठपुरावा केला आहे. माजी अन्न, नागरी, पुरवठा मंत्री छगन भुजबळ तसेच अन्न, नागरी पुरवठा विभागाचे सचिव विजय वाघमारे यांच्या भेटी घेत आ. मुनगंटीवार यांनी हा मुद्दा रेटला. मात्र आश्वासन देवूनही कार्यवाहीचा अभाव होता. दिनांक २ जुलै २०२२ रोजी आ. सुधीर मुनगंटीवार यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेत या मागणीचे निवेदन सादर केले. यावेळी झालेल्या चर्चेअंती २ दिवसात याबाबतचे आदेश निर्गमित करण्यात येईल, असे आश्वासन उपमुख्यमंत्र्यांनी दिले होते. सदर आश्वासनाची पुर्तता झालेली असून दिनांक ३ जुलै रोजी याबाबतचे आदेश निर्गमित करण्यात आले.
पणन हंगाम २०२१-२२ (रब्बी) मध्ये केंद्र शासनाने १.८५ एलएमटी धान खरेदीस दिलेल्या मंजूरीच्या अनुषंगाने मार्केटींग फेडरेशन यांना १.३४ एलएमटी आणि आदिवासी विकास महामंडळ यांना ०.५१ एलएमटी इतके धान खरेदीची उदि्दष्ट नेमून देण्यात आले होते. हे उदि्दष्ट दोन्ही अभिकर्ता संस्थांनी पूर्ण केले आहे. केंद्र शासनाच्या दिनांक २ जुलै २०२२ च्या पत्रान्वये ३.०२४ एलएमटी धान खरेदीस मान्यता दिली आहे. या मंजूर उदि्दष्टापैकी उक्त हंगामासाठी यापूर्वी दिलेले १.८५ एलएमटी धान खरेदीचे उदि्दष्ट वगळता उर्वरित १.१७४ एलएमटी पैकी मार्केटींग फेडरेशन यांना ०.८२ एलएमटी आणि आदिवासी विकास महामंडळ यांना ०.३५ एलएमटी इतके धान खरेदीचे उदि्दष्ट नेमून देण्यात आले आहे.
अभिकर्ता संस्थांनी दिनांक ३०.९.२०२१ रोजीच्या शासन निर्णयातील तरतूदीनुसार त्यांना दिलेल्या उदि्दष्टानुसार धान खरेदी करावी तसेच सदर धान खरेदी कोणत्याही परिस्थीतीत १५ जुलै २०२२ रोजी पूर्ण करण्यात यावी असा निर्णय शासनाने अभिकर्ता संस्थांना दिले आहे.
आ. सुधीर मुनगंटीवार यांच्या पुढाकाराने धान उत्पादक शेतक-यांना मोठा दिलासा मिळाला असून उन्हाळी हंगामातील धान खरेदीचे उदि्दष्ट वाढल्याने शेतक-यांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. यासंदर्भात त्वरेने निर्णय घेतल्याबद्दल आ. सुधीर मुनगंटीवार यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आभार व्यक्त केले आहे.