पोंभूर्णा:- तालुक्यात अतिवृष्टीमुळे शेतकर्यांच्या शेतातील पिकांचे अतोनात नुकसान झाले. गेल्या चार महिन्यांपासून मोठ्या कष्टाने कपाशी,धानपिकांची निगा राखून भरघोस उत्पादन घेण्यासाठी शेतकरी धडपड करीत होते. मात्र, निसर्गाच्या अवकृपेमुळे सततच्या पावसामुळे तालुक्यातील शेतकऱ्यांच्या पिकाचे मोठे नुकसान झाले. सततच्या पावसामुळे कपाशी,धानपीक पूर्णतः शेतात पड़ून मातीमोल झाले आहेत. त्यामुळे शेतकरी हवालदिल झाले आहेत. या गंभीर समस्येकडे लक्ष देऊन शासनाने पोंभुर्णा तालुक्याला ओला दुष्काळ जाहीर करून सरसकट एकरी ५० हजार रुपयांची आर्थिक मदत द्यावी व शेतकऱ्यांची संपूर्ण कर्जमाफी करण्याची मागणी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे तालुका प्रमुख आशिष कावटवार यांच्या नेतृत्वात शिष्टमंडळाने तहसीलदार मोहनीश शेलवटकर यांच्या मार्फत मुख्यमंत्र्यांना पाठविलेल्या निवेदनातून केली आहे.
पोंभूर्णा तालक्यातील मुख्यत्वे भाताची, कपाशीची शेती असून तालुक्यातील शेतकऱ्यांना कुठलाही जोडधंदा नाही. आता शेतकऱ्यांवर उपासमारीजी पाळी येऊन ठेपलेली आहे. काही दिवसांपासुन शेतकऱ्यांना पावसाची गरज नसताना सतत येणाऱ्या पावसामुळे तूडतुडा, करपा सारखे रोग धानपिकांवर आले आहेत. त्यामुळे यावर्षी उत्पन्न हातात येईल की नाही याची चिंता सतावत होती.यातच पुन्हा सोमवारी झालेल्या मुसळधार पावसामुळे शेतकऱ्यांचे उभे पीक आडवे पडले आहेत. तालुक्यातील बहुतेक शेतकऱ्यांचे धान सडण्याच्या मार्गावर असून कुटुंबाचा उदरनिर्वाह कसा करायचा असा प्रश्न तालुक्यातील शेतकऱ्यांसमोर उभा ठाकला आहे.
त्यामुळे पोंभूर्णा तालुक्याला तत्काळ ओला दष्काळ जाहीर करून शेतकऱ्यांना एकरी ५० हजार रुपयांची आर्थिक मदत देण्यात यावी व संपूर्ण कर्जमाफी करावी अशी मागणी शिवसेनेचे तालका प्रमुख आशिष कावटवार यांनी केली आहे.यावेळी घनोटीचे सरपंच पवन गेडाम, वेळवाचे सरपंच जितेंद्र मानकर,चेक हत्तीबोडीचे माजी सरपंच विलास बुरांडे, घाटकूडचे माजी सरपंच गंगाधर गद्देकार,गोकुळ तोडासे,संदिप सुमटकर, समीर कालिदास उईके, जगदीश देवताळे आदि कार्यकर्ते उपस्थित होते.