Chandrapur Braking News: चंद्रपूर-वर्धा-गडचिरोली मतदार संघातून काँग्रेसचे शैलेश अग्रवाल यांची माघार!

Bhairav Diwase

चंद्रपूर:- विधान परिषद निवडणुकीच्या तोंडावर काँग्रेसला चंद्रपूर-वर्धा-गडचिरोली स्थानिक मतदार संघातून मोठा झटका बसला आहे. काँग्रेसचे अधिकृत उमेदवार शैलेश अग्रवाल यांनी निवडणुकीतून नाट्यमयरीत्या आपली माघार घेतली आहे. आज नामांकन अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी त्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात जाऊन आपला अर्ज मागे घेतला.

विशेष म्हणजे, या निर्णयाची कोणतीही पूर्वकल्पना त्यांनी स्थानिक काँग्रेस नेते किंवा कार्यकर्त्यांना दिली नव्हती. ते एकटेच जिल्हाधिकारी कार्यालयात पोहोचले आणि त्यांनी अर्ज मागे घेतल्याने राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे. ऐन निवडणुकीच्या तोंडावर राष्ट्रीय पक्ष असलेल्या काँग्रेसची यामुळे मोठी नाचक्की झाली आहे.

शैलेश अग्रवाल यांनी या धक्कादायक निर्णयाचे कारण स्पष्ट करताना सांगितले की, काँग्रेसकडे विजयासाठी आवश्यक असलेले पुरेसे संख्याबळ नव्हते. त्यामुळेच आपण हा निर्णय घेतला असून, पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांना याची पूर्वकल्पना दिली होती, असा दावाही त्यांनी केला आहे. दरम्यान, याच मतदार संघातून सुधीर कोठारी या अपक्ष उमेदवारानेही आपला अर्ज मागे घेतला आहे. त्यामुळे आता या जागेवर महायुतीचे उमेदवार अरुण लाखानी यांचा बिनविरोध विजय होण्याचा मार्ग मोकळा झाला असून, त्यांच्या विजयावर जवळपास शिक्कामोर्तब झाले आहे.

या नाट्यमय घडामोडींमुळे स्थानिक पातळीवर महायुतीच्या गोटात उत्साहाचे वातावरण आहे, तर दुसरीकडे काँग्रेसमध्ये अंतर्गत वादाला तोंड फुटण्याची शक्यता निर्माण झाली आहे. या संपूर्ण प्रकरणावर काँग्रेसचे वरिष्ठ नेते आता काय भूमिका घेतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.