Top News

आता सरपंच करतील ऑनलाईन शिक्षणासाठी जिल्हा प्रशासनाला मदत

सीईओंनी साधला सरपंचाशी संपर्क.
Bhairav Diwase.    July 14, 2020
(आधार न्यूज नेटवर्क ग्रामीण प्रतिनिधी) नागेश्वर गणेशकर, चंद्रपुर
चंद्रपूर:- कोरोना विषाणू प्रादुर्भावाच्या काळात जिल्ह्यातील शाळादेखील तूर्तास 31 जुलै पर्यंत बंदच असणार आहे.परंतू सद्यस्थितीत शाळा जरी सुरु नसल्या तरी मूलांचे शिक्षण सुरु राहीले पाहीजे.या करिता शासनस्तरावरुन अनेक उपाययोजना करण्यात येत आहे. मुलांपर्यंत ऑनलाईन माध्यमाद्वारा अभ्यासक्रम पोहचविण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे.यामध्ये आकाशवाणी, टिव्ही. व्हॉटस अॅप, दिक्षा अॅप, झूम अॅप, मोबाईल मॅसेजद्वारा संपर्क यांचा प्रामुख्याने समावेश आहे. गावाचे प्रमुख म्हणून प्रत्येक विद्यार्थ्यांना ऑनलाईन शिक्षण पोहचविण्यासाठी पुढाकार घेण्याचे आवाहन जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल कर्डिले यांनी जिल्ह्यातील सरपंचांना पत्राद्वारे केले आहे.

या पत्रामध्ये पालकांनी मुलांच्या शिक्षणात खंड पडणार नाही यासाठी ऑनलाइन शिक्षण पद्धतीचा स्वीकार करावा, असे आवाहन देखील पालकांना सीईओंनी केले आहे. मुलांपर्यंत मोफत पाठयपुस्तके शालेय सत्र सुरु होण्यापूर्वीच पोहचविण्यात आलेली आहे. याचा ही विद्यार्थ्यांना निश्चितच फायदा होत आहे.

कोणत्याही परिस्थितीत मुले शिक्षणाच्या प्रवाहाबाहेर राहणार नाही. यासाठी शासनस्तरावरुन सुरु करण्यात आलेले उपक्रम जिल्ह्यातील विद्यार्थ्यांपर्यंत प्रभावीपणे पोहोचविण्यासाठी सर्वांची जबाबदारी आहे. जिल्ह्यात सद्यस्थितील पुढील उपक्रम राबविण्यात येत आहे.

दिक्षा अँप : विद्यार्थ्यांच्या शिक्षणात खंड पडू नये या करिता सर्व इयत्ताच्या शालेय अभ्यासक्रमावर आधारीत उत्कृष्ट व्हिडीओज या अॅपवर उपलब्ध करुन देण्यात आलेले आहे. यामध्ये प्रत्येक वर्गासाठी तसेच प्रत्येक विषयासाठी व्हिडीओ उपलब्ध आहेत. कोणत्याही स्मार्टफोनद्वारा हे सर्व साहित्य विद्यार्थ्यांच्या हातामध्ये सहज उपलब्ध आहे.

शाळा बंद परंतु शिक्षण सुरु : राज्यस्तरावरुन दररोज सकाळी इयता 1 ली ते 12 वी पर्यंतच्या विद्यार्थ्यांकरिता अभ्यासक्रमावर आधारीत स्मार्टफोनमध्ये लिंकद्वारा अभ्यास घटक उपलब्ध करुन देण्यात येत आहे.

शाळा बाहेरची शाळा: हा कार्यक्रम आकाशवाणीवरुन दर मंगळवारी व शुक्रवार सकाळी 10.30 ते 10.45 या वेळेत प्रक्षेपीत करण्यात येत आहे. स्मार्टफोनवरील अॅपद्वारा सुध्दा हा कार्यक्रम ऐकता येवू शकतो. प्रक्षेपीत झालेल्या कार्यक्रमाचे भाग पुन्हा पुन्हा ऐकता येवू शकतात. जिल्ह्यातील काही गावामध्ये हा कार्यक्रम विहारे व मंदिरे येथे उपलब्ध असलेल्या लाऊड स्पीकरवरुन गावातील सर्व विद्यार्थ्यांपर्यंत पोहचविण्याचा स्तुत्य उपक्रम राबविण्यात येत आहे. याची दखल विभागीय आयुक्त, नागपूर यांनी सुध्दा घेतलेली आहे.

ज्ञानगंगा टिव्ही चॅनल : प्रत्येक पालकांकडे स्मार्टफोन नसला तरी घरी टिव्ही असलेल्या पालकांची संख्या ही जास्त आहे. मुलांपर्यंत पोहचण्याचे सर्वात स्वस्त साधन आहे. ही बाब लक्षात घेवून राज्य शासनाने दिनांक 5 जुलै 2020 पासून इयत्ता 10 वी करीता मराठी व इंग्रजी माध्यम तसेच 12 वी करीता स्वतंत्र टिव्ही चॅनल सुरु करण्यात आलेले आहे. उर्वरीत प्रत्येक वर्गासाठी सुध्दा स्वतंत्र टिव्ही चॅनल लगेचच सुरु होत आहे. याद्वारे प्रत्येक विद्यार्थ्यांपर्यंत शिक्षण पोहचविणे शक्य होणार आहे.

गली गली सिमसिम : शालेय अभ्यासक्रमावर आधारीत गली गली सिमसिम कार्यक्रम सह्याद्री वाहिनीवर रोज सकाळी 10 वाजता प्रक्षेपित करण्यात येत आहे. याद्वारेही विद्यार्थ्यांचा अभ्यासक्रम घेण्यास मदत होणार आहे.

मोबाईलद्वारा शिक्षण: शालेय स्तरावर आज पर्यंत 3 हजार 616 व्हॉटस अॅप गृप तयार करण्यात आलेले आहे. याद्वारे शिक्षक स्मार्टफोन धारक पालकांच्या मुलांपर्यंत शिक्षण पोहचवित आहेत.

टिलीमीली मालीका : ही मालीका बालभारतीचा इयत्ता 1 ली ते 8 वीच्या पाठयपुस्तकातील पहिल्या सत्राच्या सर्व पाठांवर आधारित आहेत. त्यात कुठेही मुलांना कंटाळा आणणारी सलग व्याख्याने नसतील. मुलांन घरी व परिसरात करुन बघता येतील अशा कृती निष्ठ शैक्षणिक अनुभव देण्यात येणार आहेत. यामध्ये रोज प्रत्येक इयत्ता 1 विषयाचा 1 पाठ या प्रमाणे प्रत्येक इयतेचे 60 पाठ, 60 दिवसात, 60 एपिसोड मध्ये सादर करण्यात येणार आहे. ही मालीका दिनांक 20 जुलै 2020 पासून सोमवार ते शनिवार सह्याद्री वाहिनीवरून प्रसारीत करण्यात येणार आहे.

श्राव्य, दृकश्राव्य, प्रिंट, सोशल मीडियाचा प्रभावी वापर करा:

ज्या पालकांकडे स्मार्टफोन किंवा टिव्ही, रेडीओची सोय उपलब्ध नाही, त्यांच्या मुलांपर्यंत या कठिण परिस्थितीत शिक्षण पोहचविणे हे  सर्वासमोर एक मोठे आव्हान आहे. गावाचे प्रमुख म्हणून शक्य ती मदत केल्यास हे आव्हान पेलणे सहज शक्य आहे. जिल्ह्यातील काही गावामध्ये या करीता मंदीरे व विहारे यामध्ये असलेले लाऊडस्पीकरचा वापर करण्याचा चांगला वापर करता येवू शकतो.  गावातील ग्रामपंचायत कार्यालय समाजभवन येथे टिव्ही, रेडीओची सोय उपलब्ध आहे. याचाही उपयोग गावातील या सुविधेपासून वंचित असलेल्या मुलांच्या शिक्षणाकरीता प्रभावीपणे करावा.

वित्त आयोगाच्या उपलब्ध निधीतून शाळेच्या परिसराचे निर्जंतुकीकरण करा:

गावाचे प्रमुख सरपंच म्हणून 14 व 15 वा वित्त आयोग तसेच ग्रामपंचायतस्तरावरील उपलब्ध निधीमधून शालेय परिसराचे निर्जंतुकीकरण तसेच शाळा सुरु झाल्यानंतर शालेय स्वच्छता व विद्यार्थ्यांच्या आरोग्याकरीता आवश्यक साधने उपलब्ध करुन देण्यासाबतच गावातील इच्छुक तरुणांना स्वयंसेवक म्हणून घोषीत करुन मुलांचे शिक्षण चालू ठेवणे आणि गावातील सार्वजनिक भिंतीवर शैक्षणिक माहिती, गणितीय सुत्रे रंगविणे करीता व ऑनलाईन माध्यमाद्वारे देण्यात येणारे शिक्षण गावातील प्रत्येक विद्यार्थ्यापर्यंत पोहचविण्याकरीता स्वतः पुढाकार घ्यावा. असे आवाहन सरपंचांना पत्र लिहून सीईओंनी केले आहे.

गावाचे प्रमुख या नात्याने पुढाकार घेऊन गावातील सर्व विद्यार्थ्यांपर्यंत राबविण्यात येणारे विविध उपक्रम पोहचविण्याकरीता निश्चितच प्रयत्न करावा,असे आवाहन केले आहे. सरपंच म्हणून आपला हातभार लावणे सर्वांसाठी अभिमानाची बाब असणार असून या पत्राद्वारे सरपंच यांना आवाहन केले आहे.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने