Top News

11 ऑगस्ट रोजी पालकमंत्री ना.वडेट्टीवार यांचे शुभहस्ते एक दिवसीय रानभाजी महोत्सवाचे उद्घाटन.

कृषी विभागाचे आयोजन.

जिल्ह्यातील रानभाज्यांची होणार ओळख.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर विशेष खबरदारी घेऊन शेतकरी व ग्राहकांनी सहभागी होण्याचे आवाहन.
Bhairav Diwase. Aug 10, 2020

(आधार न्यूज नेटवर्क ग्रामीण प्रतिनिधी) नागेश्वर गणेशकर, चंद्रपुर
चंद्रपूर:- दि. 10 ऑगस्ट: जिल्ह्यातील ग्रामीण भागामध्ये मोठ्या प्रमाणात रानभाज्या आढळून येत असल्याने व रानभाज्या आरोग्याच्या दृष्टीने उपयुक्त असल्याने रानभाज्यांचे महत्त्व लोकांपर्यंत पोहोचणे व त्यातून आदिवासी शेतकऱ्यांना उत्पन्नाचे स्त्रोत मिळावे यासाठी दिनांक 11 ऑगस्ट रोजी सकाळी 11 ते संध्याकाळी 6 पर्यंत जिल्हास्तरावर कृषी विभागाअंतर्गत एक दिवसीय रानभाज्यांचा महोत्सव शासकीय रोपवाटिका, शहर वाहतूक पोलीस कार्यालयाच्या समोर चंद्रपूर येथे आयोजित करण्यात येत आहे. या रानभाजी महोत्सवाचे उद्घाटन राज्याचे मदत व पुनर्वसन, आपत्ती व्यवस्थापन, इतर मागास, बहुजन कल्याणमंत्री तथा चंद्रपूर जिल्ह्याचे पालकमंत्री ना. विजय वडेट्टीवार यांचे शुभहस्ते होणार आहे.


रानभाजी महोत्सवामध्ये खासदार सुरेश उपाख्य बाळू धानोरकर, आ. प्रतिभा धानोरकर, आ.किशोर जोरगेवार, आ.सुधीर मुनगंटीवार, आ.सुभाष धोटे, आ. किर्तीकुमार भांगडीया, जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा संध्याताई गुरनुले, महापौर राखी कंचर्लावार, जिल्हाधिकारी डॉ. कुणाल खेमनार, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल कर्डिले, आयुक्त राजेश मोहिते तसेच कृषी विभागाचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित असणार आहेत.

आजच्या स्थितीत आहारात फारच ठराविक भाज्या असतात जसे कांदे, बटाटे, वांगे इत्यादी आणि पालेभाज्यांमध्ये पालक आणि मेथी पलीकडे फारशी माहिती शहरी लोकांना नाही. याउलट ग्रामीण भागातील ग्रामस्थांच्या जीवनात आणि जेवणात मात्र विशेषतः खरिपात अर्थात पावसाळी हंगामात भरपूर विविध प्रकार असतात. यामुळे त्यांचे आरोग्य सुद्धा चांगले राहते. या रान भाज्यांमध्ये औषधी गुण सुद्धा असल्याने, त्याचा फायदा चांगले आरोग्य राखण्यात होतो. याचा फायदा शहरातील नागरिकांना व्हावा यासाठी कृषी विभागाकडून उपक्रम राबविण्यात येत आहे.

रानभाज्यांच्या महोत्सवात जे प्रकार आता पुरेसे उपलब्ध आहेत, अशा भाज्या विक्रीस उपलब्ध असतील. यामुळे ग्रामीण भागातील रान भाज्यांच्या विविधता बाबत नागरिकांना ओळख होईल. आणि शिवाय शहरातील नागरिकांना या भाज्यांची ओळख झाल्याने, त्यांचे कडून भाज्यांची मागणी झाल्यास, असा भाजीपाला शेतकरी उत्पादित करतील, त्याचा फायदा शेतकऱ्यांना होईल. सर्व शेतकरी व ग्राहकांनी या रानभाजी महोत्सवाचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा कृषी विभागांतर्गत करण्यात आले आहे.

कोरोना संसर्ग काळामध्ये सामाजिक अंतर राखून, मास्कचा वापर करून, परिसराचे निर्जंतुकीकरण इत्यादी सुरक्षेची विशेष खबरदारी घेऊन रानभाजी महोत्सव होणार आहे.

असे आहे रानभाज्यांचे प्रकार :

रानभाज्यामध्ये कंदभाज्या उदा. करांदे, कणगर, कडूकंद, कोनचाई, अळू इत्यादी आहेत. हिरव्या भाज्या उदा. तांदुळजा, काठेमाठ, कुडा, टाकळा, कोहळा, कुई, घोळ, कवळा, लोथ इत्यादी आहेत. फळभाज्या उदा. करटोली, वाघेटी, चीचुर्डी, पायार, मोह, कपाळफोडी, काकड इत्यादी आहेत. फुलभाज्या उदा. कुडा, शेवळ, उळशी तसेच विदर्भातील तरोटा कुड्याच्या शेंगा या रानभाज्यांची ओळख, आरोग्याच्या दृष्टीने त्याचे महत्व, पाककृती इत्यादीविषयी माहिती शहरी भागातील ग्राहकांना होणार आहे.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने