Top News

महाविकास, भाजप, प्रहार आणि अपक्षांनी वंचितची एकहाती सत्ता खेचली...... #Akola


अकोला:- जिल्हा परिषदेमध्ये वंचित बहुजन आघाडीची सत्ता होती. ओबीसीचे राजकीय आरक्षण रद्द झाल्‍यानंतर झालेल्या पोटनिवडणुकीतही वंचितने चांगले यश मिळविले. पण जिल्हा परिषदेच्या महिला व बाल कल्याण समिती आणि इतर विषय समिती सभापती पदाच्या निवडणुकीत शिवसेना, राष्ट्रवादी कॉंग्रेस, कॉग्रेस, भाजप, प्रहार व दोन अपक्षांच्या (महाविकास आघाडी) रणनीतीने जिल्हा परिषदेतील वंचितच्या एकहाती सत्तेला काल सुरुंग लावला.
सभापतींच्या निवडणुकीत प्रहारच्या जिल्हा परिषद सदस्या स्फूर्ती गावंडे यांना ५३ पैकी २९ मते मिळाली तर त्यांच्या विरोधातील वंचितच्या उमेदवार योगिता रोकडे यांना २४ मते मिळाली. त्यामुळे सभापती पदाच्या निवडणुकीत स्फूर्ती गावंडे यांचा ५ मतांनी विजय झाला. विषय समिती सभापती पदाच्या निवडणुकीत महाविकास आघाडीचे अपक्ष उमेदवार सम्राट डोंगरदिवे यांचा एकमात्र अर्ज दाखल झाल्याने त्यांची निवड अविरोध झाली. दोन पैकी एकाही सभापती पदी वंचितचा उमेदवार निवडून न आल्याने जिल्हा परिषदेच्या सत्तेत महाविकास आघाडीच्या रणनीतीमुळे प्रहार व अपक्ष सदस्यांच्या गळ्यात सभापती पदाची माळ पडली.
नुकत्याच झालेल्या जिल्हा परिषदेच्या पोटनिवडणुकीनंतर सभापती पदाच्या निवडणुकीची प्रक्रिया शुक्रवारी (ता. २९) जिल्हाधिकारी निमा अरोरा यांच्या आदेशाने जिल्हा परिषदेत पार पडली. उपजिल्हा निवडणूक अधिकारी तथा अध्यासी अधिकारी मुकेश चव्हाण यांनी जिल्हा परिषदेच्या सभागृहात सकाळी ११ ते दुपारी १ वाजेपर्यंत सभापती पदासाठी इच्छुकांना नामनिर्देशन पत्रांचे वाटप केले. त्यानंतर दुपारी ३ वाजता जिल्हा परिषदेच्या सभागृहात निवडणुकीसाठी ५३ सदस्यांनी हजेरी लावली. दुपारी ३.१५ ते ३.३० वाजेपर्यंत नामनिर्देशन पत्रांची छाननी तर ३.३० ते ३.४० वाजेपर्यंत उमेदवारी अर्ज मागे घेण्याची वेळ असल्याने महिला व बाल कल्याण समिती सभापती पदाच्या निवडणुकीतून वंचितच्या संगिता अढावू यांनी उमेदवारी अर्ज मागे घेतला. महिला व बाल कल्याण समिती सभापती पदाच्या निवडणुकीत वंचितकडून योगिता रोकडे व प्रहारच्या स्फूर्ती गावंडे यांचे अर्ज वैध ठरल्याने एका पदासाठी हात वर करून मतदानाची प्रक्रिया पार पडली. त्यामध्ये वंचितच्या उमेदवार योगिता रोकडे यांना २४, तर प्रहारच्या उमेदवार स्फूर्ती गावंडे यांना २९ मते मिळाली. मतदानानंतर अध्यासी अधिकारी तथा उपजिल्हा निवडणूक अधिकारी मुकेश चव्हाण यांनी प्रहारच्या उमेदवार स्फूर्ती गावंडे यांना पाच मतं अधिक मिळाल्याने विजयी घोषित केले, तर अपक्ष उमेदवार सम्राट डोंगरदिवे यांच्या विरोधात एकही उमेदवारी अर्ज न मिळाल्याने त्यांना विषय समिती सभापती पदासाठी विजयी घोषित केले. सदर निवडणूक प्रक्रियेदरम्यान उपमुख्य कार्यकारी अधिकारी सुरज गोहाड यांच्यासह निवडणूक विभागाचे निलेश सांगळे, श्रीकांत देशपांडे यांची उपस्थिती होती.
भाजप पुन्हा किंगमेकर.....

जिल्हा परिषदेच्या पोटनिवडणुकीत १४ पैकी ६ जागी वंचितचे तर पंचायत समितीच्या २८ पैकी १६ जागी वंचितच्या उमेदवारांनी विजय मिळविला. त्यामुळे पोटनिवडणुकीपूर्वीचे १७, आताचे ६ व एक अपक्ष सदस्य प्रमोदिनी कोल्हे यांनी वंचितला पाठिंबा दिल्यामुळे वंचितची सध्या जिल्हा परिषदेत २४ सदस्य संख्या आहे. दुसरीकडे वंचितच्या विरोधात शिवसेनेचे १३, कॉंग्रेस व राष्ट्रवादी कॉंग्रेसचे प्रत्येकी चार-चार, प्रहार जनशक्ती पक्षाचा एक, तर दोन अपक्ष अशा एकूण २४ सदस्यांची महाविकास आघाडीने मोट बांधली आहे. सत्ताधारी व विरोधकांकडे सारखेच संख्याबळ झाल्याने सभापती पदाच्या निवडणुकीत चांगलीच चुरस पाहायला मिळाली. परंतु या निवडणुकीत भाजपच्या पाच सदस्यांनी गत निवडणुकी प्रमाणे तटस्थ न राहता एका सभापती पदासाठी महाविकास आघाडीच्या बाजूने मतदान केल्याने वंचितला पराभवाचा सामना करावा लागला.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने