Top News

धानाला एक हजार रुपये प्रतिक्विंटल बोनस द्या #Saoli #saolinews

सावली तालुक्यातील शेतकऱ्यांची मागणी
(आधार न्युज नेटवर्क ग्रामीण प्रतिनिधी) सौरभ चौधरी, सावली
सावली:- भारत हा कृषिप्रधान देश म्हणून ओळखला जातो. संपूर्ण जगात शेतीला खूप मोठे प्राधान्य देण्यात आले आहे व शेतकरी सुखी तर पूर्ण जग सुखी, अशी म्हण प्रख्यात आहे. परंतु शेतकऱ्यांची परस्थिती ही मात्र उलट आहे. जगाचा पोशिंदा असलेल्या शेतकऱ्यांकडे कोणतेही शासन लक्ष द्यायला तयार नाही. शेतकरी रक्ताचे पाणी करून आपल्या कुटुंबाचे कसेबसे पालनपोषण करीत असून अत्यंत दारिद्गी जीवन जगत असल्याने शेतकऱ्यांचा वाली कोण? असा प्रश्न विचारला जात आहे.
आता धान पिकाचा हंगाम संपलेला असून थ्रेशर मशीनद्वारे धान काढणे सुरू आह. मात्र शेतकऱ्यांच्या धानाला भाव मिळत नाही व पीक हातात येताच अनेक शेतकरी धानविक्रीसाठी नेत आहेत. मात्र, व्यापाऱ्यांकडून हमीभावापेक्षा कमी दराने धानाची खरेदी कारण्यात येत आहे. राबराब राबून शेतकऱ्यांच्या मालाला भाव मिळत नसेल तर शेतकऱ्यांनी काय करावे, असा यक्ष प्रश्न शेतकऱ्यांना पडत आहे.
बियाणे खरेदी व लागवडीपासून ते घेतलेले पीक विकेपर्यंत शेतकऱ्यांना एकरी २० हजारापेक्षा जास्त खर्च येत आहे. मात्र त्या मानाने उत्पन्न होत नसल्याने व झालेल्या उत्पन्नाला योग्य भाव मिळत नसल्याने शेतीच्या लागवडीचा खर्च निघणे कठीण झाले आहे. प्रतिएकर बियाणे १५०० रुपये, नांगरणी २०००, चिखलटी २०००, रोवणे २५००, निंदने ८०० खते २०००, कापणी २२००, बांधणे २३०० व धान मशिनद्वारे काढणे १००० व इतर मजुरी असा सरासरी खर्च काढल्यास २० हजारापेक्षा जास्त खर्च होत असून पीक मात्र १० ते १२ क्विंटलपर्यंत होते. त्यामुळे शेतकऱ्यांचे उत्पादन २० ते २२ हजार होते. याचाच अर्थ शेतकऱ्यांचे साधे मुद्दलसुद्धा निघत नाही. त्यामुळे शेतकरी मेटाकुटीला येऊन अनेकवेळा आत्महत्या करताना दिसत आहे. देशातील शेतकऱ्यांकडे केंद्र सरकार व राज्य सरकार लक्ष देत नसल्याने शेतकऱ्याचे हाल होत आहे. याकडे पालकमंत्रीसुद्धा लक्ष द्यायला तयार नाही. आतातरी शासनाने शेतकऱ्यांचा विचार करून किमान १००० रुपये बोनस देऊन धानाला ३५०० ते ४००० रुपये भाव द्यावा, अशी मागणी सावली तालुक्यातील शेतकऱ्यांकडून केली जात आहे.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने