मकरसंक्रांतीला काही दिवस उरले असले तरी डिसेंबरची चाहूल लागताच पतंगीचा मोसम सुरू झाला आहे. त्यासोबतच पतंग उडविण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या नायलॉन मांज्यामुळे होणारे अपघातही सुरू झाला.
बंदी असलेला नायलॉन मांज्या बाजारात खुलेआम विक्री होत असल्याने पशू-पक्ष्यांसोबत दुचाकी चालकांसाठीही घातक ठरणार आहे. त्यामुळे पुढील एक-दोन महिने वाहन चालविताना जरा सांभाळूनच चालवावे!
पतंग उडविण्याचा मोह लहानांपासून तर मोठ्यांपर्यंत सर्वांनाच होतो. हा मोह त्यांना टाळताही येत नाही. मात्र, शहरी भागात महावितरणाच्या लघु व उच्च दाब वाहिन्यांचे जाळे पसरलेले असते आणि अनेकदा पतंग उडविताना किंवा कापलेले पतंग विजेच्या तारांवर किंवा खांबांवर अडकतात, अशावेळी ती अडकलेली पतंग काठ्या, लोखंडी सळाखी किंवा गिरगोट यांच्या माध्यमातून काढण्याचा प्रयत्न केला जातो. या प्रयत्नात अनेकदा जिवंत विद्युत तारेला स्पर्श होण्याची शक्यता असल्याने अडकलेली पतंग काढण्याचा प्रयत्न जिवावर बेतू शकतो. संक्रांत हा आनंदाचा उत्सव असून, त्याला गालबोट लागू नये, याकरिता पतंग उडविताना पुरेपूर सावधगिरी बाळगणे आवश्यक आहे.
बरेचदा अडकलेल्या पतंगीचा मांजा खाली जमिनीवर लोंबकळत असतो, हा मांजा ओढून पतंग काढण्याच्या प्रयत्नातही विजेचा भीषण अपघात होण्याची दाट शक्यता असते. मांजा ओढताना एका तारेवर दुसऱ्या तारेचे घर्षण होऊन शॉर्ट सर्कीट होण्याचा, प्रसंगी प्राणांतिक अपघात होण्याचा तसेच वीजपुरवठा खंडित होण्याचा प्रकारही घडू शकतो. सध्या बाजारात धातुमिश्रित मांजा मोठ्या प्रमाणात विक्रीकरिता उपलब्ध आहे, हा मांजा वीजप्रवाही तारांच्या किंवा रोहित्र वा महावितरण यंत्रणेच्या संपर्कात आल्यास त्यातून वीज प्रवाहित होऊन प्राणांतिक अपघाताची शक्यता आहे. त्यासोबत धातू मिश्रीत नायलॉन मांज्यामुळे रस्त्याने जाणाऱ्या वाहन चालकांच्या गळ्यात अडकून प्राणांतिक अपघात होण्याची शक्यताही असते. असे प्रकार यापूर्वी अनेक वेळा घडले आहेत. त्यामुळे पालकांना मुलांना पतंग उडविण्यासाठी मांज्या घेवून देताना व मुलं पतंग उडवित असताना पुरेशी काळजी घेणे आवश्यक आहे. कोणताही अपघात होण्यापूर्वी तो होऊच नाही यासाठी काळजी घेतलेली कधीही योग्यच!
पतंग उडविताना याची घ्या काळजी
वीज तारांवर अडकलेली पतंग काढणे जीवघेणे ठरू शकते.
तारांमध्ये अडकलेला मांजा ओढू नये.
अडकलेली पतंग किंवा मांजा काढायला रोहित्रावर चढू नये.
धातुमिश्रित अथवा नायलॉनचा मांजा टाळावा.
वीज तारा असलेल्या परिसरात पतंग उडविणे टाळा.
तारांत अडकलेली पतंग काढण्यासाठी दगडाला दोरा बांधून तारांवर फेकू नये.
पतंग उडविणाऱ्या पाल्यांकडे पालकांनी लक्ष द्यावे.
वाहन चालकांनी घ्यावी ही काळजी!
वाहन चालकांनी पुढील दोन-तीन महिने वाहन चालविताना वेगावर नियंत्रणे ठेवावे.
वाहन चालविताना चेहरा व गळ्यावर कापड बांधवा. जेणे करून रस्त्यावर आडवा आलेल्या मांज्याने कोणतीही गंभीर दुखापत होणार नाही.
मुले पतंग पकडण्यासाठी रस्त्यांवरून धावतात. त्यामुळे ज्या भागात पतंग उडविणारी मुले आहेत, तेथे गाडीचा वेग अत्यंत्य कमी ठेवा.