Top News

तलाठी परीक्षेतील गोंधळाला राज्य सरकार जबाबदार #chandrapur #gadchiroli


वडेट्टीवार म्हणाले ' एखाद्या बेरोजगार तरूणाचा जीव...'

राज्यात तलाठी भरतीची परीक्षा सुरू असून सर्व्हर डाऊन असल्यामुळे हजारो विद्यार्थ्यांना परिक्षेपासून वंचित राहावे लागले आहे. अन्न, पाण्याविना हजारो विद्यार्थी ताटकळत होते.

अनेक परिक्षा केंद्रावर परिक्षा खोळंबल्या आहेत. शासनाच्या नियोजनशून्य कारभारामुळे एखाद्या विद्यार्थ्यांचा जीव गेल्यास त्यांची सर्वस्वी जबाबदारी सरकारची असेल अशी टिका राज्याचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी केली आहे. दरम्यान राज्यातील सरकारने परिक्षेच्या माध्यमातून बेरोजगारांची थट्टा चालविली असल्याचा आरोप केला.

नोकरी लागावी यासाठी गोर-गरीब, शेतमजूर, शेतकऱ्यांचे मुलं एक दिवस अगोदर परिक्षा केंद्रावर आली. राज्यातील विविध जिल्ह्यातून परिक्षार्थी सकाळी सात वाजता परिक्षा केंद्रावर पोहोचले होते. दहा वाजले तरी परिक्षा सुरू झाली नव्हती. सर्व्हर डाऊन असल्यामुळे हजारो विद्यार्थ्यांना परिक्षेपासून वंचित राहावे लागले आहे. राज्यातच चार परिक्षा केंद्र आहे. त्यामुळे मुलांना प्रचंड पायपीट सहन करावी लागली. जिल्हावार परिक्षा केंद्र नसल्यामुळे विद्यार्थ्यांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. नागपूर जिल्ह्यातील परिक्षा केंद्रावर मराठवाड्यातील लातूर, जालना इथपासून विद्यार्थी आले आहेत, असे वडेट्टीवार म्हणाले.

खाणे, पिणे, जेवण, झोपायची कुठेही व्यवस्था नाही. गरीब, शेतकरी, शेतमजूर, कामगारांची मुलं परिक्षेला बसली आहेत. अशावेळी जिल्हावार परिक्षाकेंद्र द्यायला हवे होते. मात्र सरकारने तसे केले नाही. सरकारची भूमिका बेरोजगार तरूणांचे शोषण करणारी आहे. गरीबांच्या मुलांनी प्रवासासाठी पाच पाच हजार रूपये कुठून आणायचे. परिक्षाशुल्कापोटी गोर-गरीब विद्यार्थ्यांकडून १००० रूपये घ्यायचे अन् परिक्षेचे नियोजन योग्य पध्दतीने करायचे नाही व वेळेवर सर्व्हरचे कारण द्यायचे हे चालणार नाही. याची सर्वस्वी जबाबदारी सरकारची आहे, असेही विजय वडेट्टीवार यांनी म्हटले आहे.

परिक्षेच्या नावावर विद्यार्थ्यांकडून दोनशे कोटींपेक्षा अधिकची रक्कम सरकारने गोळा केली. आता ज्या विद्यार्थ्यांना सर्व्हर डाऊनमुळे परिक्षा देता आली नाही. त्यांच्याकडून नव्याने शुल्क आकारू नये, तसेच त्या परिक्षार्थीच्या प्रवासाची सोय सरकारने करावी अशी मागणीही वडेट्टीवार यांनी यावेळी केली आहे. ऑनलाईन परिक्षेसाठी १००० रूपये घ्यायचे, परिक्षेचे योग्य पध्दतीने नियोजन करायचे नाही, वारंवार परिक्षा रद्द करायच्या यामुळे विद्यार्थी संतापले असून या सर्वांचे रूपांतर उठावात होईल, अशी ताकीद वडेट्टीवार यांनी यावेळी दिली.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने