Top News

चंद्रपूर लोकसभा निवडणूक:- बल्लारपूर विधानसभा क्षेत्रात ३००९७८ मतदार बजावणार मतदानाचा हक्क #chandrapurloksabha #chandrapur #pombhurna


१९ एप्रिलला मतदान;१५८८ कर्मचारी रहाणार तैनात

३६१ मतदान केंद्र, संवेदनशील केंद्र-०

पोंभूर्णा:- लोकसभा मतदारसंघाच्या निवडणुक कार्यक्रमाची रुपरेषा व निवडणूक प्रक्रिये विषयी माहिती देण्यासाठी दि.१७ मार्च रोजी उपविभागीय कार्यालय मुल येथे पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते.उपविभागीय अधिकारी मुल तथा ७२-बल्लारपूर विधानसभा मतदारसंघ सहा. निवडणूक निर्णय अधिकारी विशालकुमार मेश्राम यांच्या अध्यक्षतेखाली १३-चंद्रपूर लोकसभा मतदार संघात पहिल्या टप्यात निवडणूका पार पडणार असल्याने आचारसंहितेचे काटेकोर पालन व निवडणूकीचे वेळापत्रक,विधानसभा निहाय मतदारांची आकडेवारी याबाबत सविस्तर माहिती पत्रकार परिषदेतून देण्यात आली.

भारत निवडणूक आयुक्त यांनी १६ मार्चला लोकसभा सार्वत्रिक निवडणूक कार्यक्रम घोषित केला होता.लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यात १३-चंद्रपूर लोकसभा मतदार संघाची निवडणूक १९ एप्रिलला जाहिर करण्यात आली.लोकसभा सार्वत्रिक निवडणूकीच्या अनुषंगाने आदर्श आचारसंहितेची प्रभावीपणे अंमलबजावणी करण्याच्या दृष्टीने सहा.निवडणूक निर्णय अधिकारी ७२-बल्लारपूर विधानसभा मतदारसंघ तथा उपविभागीय अधिकारी मुल यांनी विधानसभा निहाय निवडणूक प्रक्रिया, मतदार, मतदान केंद्र, विशेष व्यवस्था, मतदान प्रक्रियेतील तैनात कर्मचारी यांची पत्रकार परिषदेत माहिती दिली.बल्लारपूर विधानसभा क्षेत्रात एकूण ३ लक्ष ९७८ मतदार आहेत.यात पुरूष १,५३,९५६ मतदार, महिला १४७०१९ तर इतर मध्ये ३ मतदारांचा समावेश आहे आहे.बल्लारपूर विधानसभा क्षेत्रात जुने ३५७ मतदान केंद्र असून नविन ४ मतदान केंद्र प्रस्तावित केले आहे.असे एकूण ३६१ मतदान केंद्र राहणार आहेत.संवेदनशिल मतदान केंद्राबाबत आकडा निरंक दाखवण्यात आला आहे.सर्व निवडणूक प्रक्रियेसाठी १५८८ कर्मचारी निवडणूक प्रक्रियेसाठी तैनात राहणार असल्याची माहिती विशालकुमार मेश्राम यांनी दिली.

यावेळी मुल तहसीलदार मृदुला मोरे, पोंभूर्णा तहसिलदार शिवाजी कदम, आचार संहिता नोडल अधिकारी निलेश चव्हाण, निवडणूक निर्णय अधिकारी यशवंत पवार यांची प्रमुख उपस्थिती होती.

"मतदान केंद्रांवर दिव्यांग, गर्भवती स्त्रिया, वयोवृद्ध मतदारांकरिता विशेष व्यवस्था-
मतदान केंद्रांवर दिव्यांग मतदाराकरिता वेगळी व्यवस्था करण्यात येणार आहे. तसेच गर्भवती स्त्रिया, वयोवृध्द मतदारांकरिता सुध्दा विशेष व्यवस्था करण्यात येणार आहे. त्यांना मतदानाकरिता प्रथम प्राधान्य देण्यात येईल.

काहींना जर मतदान केंद्रावर येऊन मतदान करता येणे शक्य न झाल्यास त्यांना पोस्टल मतदानाच्या माध्यमातून घरून मतदान करण्याची व्यवस्था करण्यात आली आहे.पोष्टल मतदानाबाबत १२ डी फार्म भरल्यानंतर निवडणूक निर्णय अधिकारी किंवा सहा.निवडणूक अधिकारी यांचेकडे सादर करून पोस्टल मतदान करता येईल.अपंग म्हणून संबंधित मतदार हा ४० टक्के पेक्षा वर असणे अपेक्षित आहे.तर ८५ वयवर्षे पेक्षा जास्त असलेल्या वृद्धांना पोस्टल मतदानाचा लाभ घेता येईल.

ध्वनीक्षेपकाचा वापर हा सकाळी ६-०० रात्री १०-०० वाजेपर्यंत करायचा आहे. यासंबंधाने मा. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाचे काटेकोरपणे पालन होईल याची खबरदारी घेण्यात येणार आहे.

पेड न्युजसाठी स्वतंत्र नियंत्रण समिती नेमून त्यावर नियंत्रण ठेवण्यात येणार आहे.पेड न्युज प्रसिध्द करता कामा नये.सोशल मिडिआ मध्ये आक्षेपार्ह मजकुर असल्यास त्यावर कारवाही करण्यात येईल.

राजकीय जाहिरातीच्या प्रसारण पूर्व प्रमाणीकरण करण्यासाठी राजकीय पक्ष माध्यम प्रमाणीकरण व संनियंत्रण समिती कडे संपर्क करावा लागेल. त्याअनुषंगाने आयोगाने दिलेल्या सूचनांचे काटेकोरपणे पालन करणे बंधनकारक राहणार आहे.


वेळापत्रक:-

२० मार्च २०२४– अधिसूचना जाहीर करणे
२७ मार्च २०२४ - नामनिर्देशन पत्र दाखल करणे
२८ मार्च २०२४- नामनिर्देशन पत्राची छानणी
३० मार्च २०२४ - उमेदवारी मागे घेण्याची अंतिम तारीख
१९ एप्रिल २०२४- मतदान
४ जून २०२४ - निकाल

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने