
चंद्रपूर:- सध्या विधानसभा निवडणूकीचे वारे जोरात वाहू लागले आहेत. त्यापरीने प्रत्येक पक्षातील ईच्छूकांनी आपआपल्या परीने कामाला लागल्याचे दिसत आहे. आगामी विधानसभा निवडणुका जाहीर होण्याआधीच बल्लारपुर विधानसभा मतदार संघात इच्छुक उमेदवारांनी सुरू केलेल्या मोर्चेबांधणीच्या चर्चांनी राजकीय वातावरण तापू लागले आहे. दिवसेंदिवस इच्छुकांची नवनवी नावे चर्चेत येऊ लागली आहेत. विशेष म्हणजे शिवसेनेचे जिल्हाप्रमुख संदिप गिऱ्हे यांचीही इच्छुक म्हणून जोरदार चर्चा असल्याने सर्वांच्याच भुवया उंचावल्या आहेत.
लोकसभा निवडणुकीचा निकाल लागल्यानंतर काँग्रेसल मिळालेल्या मताधिक्याने आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बल्लारपुर विधानसभा मतदार संघात प्रत्येकच राजकीय पक्षातील हालचाली वाढू लागल्या आहेत. बल्लारपुरचे विद्यमान आमदार, पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार हे भाजपचे आमदार असून त्यांनी मागील निवडणुकीत या मतदारसंघात विजयाची हॅटट्रिक केलेली आहे. त्यामुळे यंदाही भाजपकडून त्यांना उमेदवारी मिळणे अपेक्षित आहे.
एक- दोन महिन्या अगोदर झालेल्या लोकसभा निवडणुकीत विद्यमान आमदार सुधीर मुनगंटीवार यांचा दारूण पराभव झाला व गृहक्षेत्र असलेल्या बल्लारपुर विधानसभेतून पिछाडीवर गेले. काँग्रेसच्या उमेदवार प्रतिभा धानोरकर यांना ४८ हजार २१४ मताची आघाडी बल्लारपुर विधानसभेत मिळाली. याच आकड्याने सर्व पक्षातील ईच्छूकांच्या आशा पल्लवित झाल्या आहेत. ना. सुधीर मुनगंटीवार यांचा पराभव झाल्यानंतर अवघ्या काही महिण्यावरच विधानसभेची निवडणूक येणार आहे. क्षेत्राचा केलेला कायापालट, विकास कामाकडे मतदारांनी पाठ फिरवत काँग्रेस उमेदवार प्रतिभा धानोरकर यांना पसंती दिली. त्यामुळे गेल्या लोकसभेसाठी मोठ्या प्रमाणात जातीय समीकरण चालला असावा असा कयास बांधला जात आहे. विधानसभा मतदार संघात महाविकास आघाडी कडून अनेक इच्छुकांची नांवे समोर येत आहेत. काँग्रेस कडून डॉ. अभिलाषा गावतुरे, जिल्हा बँकेचे अध्यक्ष संतोषसिह रावत, बल्लारपुरचे माजी नगराध्यक्ष घनश्याम मुलचंदानी, तर शरद पवार राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र वैद्य, व उध्दव बाळासाहेब ठाकरे शिवसेना पक्षाचे जिल्हाप्रमुख संदिप गिऱ्हे यांच्या नावांचीही जोरदार चर्चा होऊ लागली आहे.
डॉ. अभिलाषा गावतुरे सामाजिक कार्यात सहभागी होताना दिसत आहेत. त्या महिला बालरोग तज्ञ असल्याने त्या रुग्णसेवेत कार्यरत आहेत. लोकसभा निवडणुकीत त्यांनी काँग्रेस पक्षात प्रवेश घेतला आहे. तर जिल्हा मध्यवर्ती बँकेचे अध्यक्ष संतोषसिंह रावत हे बल्लारपुर विधानसभेतील मुल तालुक्यातील रहिवासी असून त्यांनाही मानणारा एक वर्ग मतदारसंघात आहे. शिवाय ते जिल्हा मध्यवर्ती बँकेचे अध्यक्ष असल्याने जिल्हाभरात ते परिचित आहेत. बल्लारपुर नगरपालिकेचे माजी नगराध्यक्ष घनश्याम मुलचंदाणी यांनी २०१४ मध्ये झालेली विधानसभेची निवडणूक लढवली होती. त्यांचा पराभव झाला होता. यावेळीही निवडणूक लढण्यास ते इच्छुक आहेत. तर राष्ट्रवादी शरद पवार गटाचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र वैद्य यांनी सुध्दा उमेदवारीसाठी आपला दावा केल्याचे ऐकिवात आहे. तर शिवसेनेचे जिल्हाप्रमुख संदिप गिऱ्हे यांनी विधानसभा क्षेत्र पिंजून काढत कार्यक्रमाचा सपाटा लावला आहे. महिलांचे मोठे मेळावे, बेरोजगार युवकांसाठी रोजगार मेळाव्याचे आयोजन केलेले आहे. तर क्षेत्रातील गावागावात भेटीगाठी, बुथ, बिएलओच्या बैठका, सामाजिक कार्यक्रमात हजेरी लावताना दिसत आहे. युवा असल्याने युवा वर्गांची गिऱ्हे यांना पसंती मिळत असल्याचे चित्र निर्माण होतांना दिसत आहे. ते स्वतः कुणबी समाजाचे प्रतिनिधीत्व करतात. त्यामूळे त्यांना तिकीट मिळणे जवळ जवळ निश्चित असल्याचा दावा त्यांचे समर्थक करत आहेत.
बल्लारपूर क्षेत्र हा बहुजनांचा बालेकिल्ला आहे. कुणबी, माळी, तेली, एसी, एसटी व इतरही बहुजन समाजाचे मतदार याठिकाणी निर्णायक आहेत. त्यामूळेच शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे जिल्हाप्रमुख संदिप गिऱ्हे बल्लारपूर विधानसभेसाठी जोरदार तयारी करीत असल्याचे दिसत आहे. पालकमंत्री मुनगंटीवार सारख्या दिग्गज नेत्याला टक्कर देण्यास सक्षम असलेला उमेदवार म्हणूनही संदिप गिऱ्हे यांचेकडे पाहिले जात आहे. तरीपण बल्लारपुर विधानसभा क्षेत्र अंतिम वाटाघाटीत महा विकास आघाडीतील कोणत्या घटक पक्षाच्या वाट्याला जाते. यावर सारे राजकीय गणित अवलंबून आहे. जिल्हा बँकेचे अध्यक्ष संतोषसिह रावत सर्व ताकदीनिशी मैदानात उतरणार असल्याचे सांगत आहेत. नुकतेच त्यांनी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या स्वगावी शेकडो समर्थकांसह भेट घेतली होती. सामाजिक क्षेत्रात कार्यरत असलेल्या डाॅक्टर अभिलाषा गावतूरे यांचेही प्रयत्न सुरू असल्याचे दिसत आहे. एकंदरीत बल्लारपुर विधानसभेत कोणत्या पक्षाकडून कोणाला अनुमती मिळते, यावर सर्वच अवलंबून राहणार आहे. त्यामुळे या क्षेत्रात महाविकास आघाडी कडून काँग्रेसचा पंजा बाजी मारणार, उबाठाची मशाल पेटणार की महायुतीकडून कमळ फुलणार हे घटक पक्षातील निवडणूकीतील जागा वाटपाच्या समीकरणावरून ठरणार आहे.