पोंभूर्णा:- आदिवासी समुदायांना समृद्ध आणि सक्षम बनवू तेव्हाच विकसित भारताचे स्वप्न साकार होईल.भिल्ल, गोंड-माडिया, कातकरी, कोळी आणि वारली या समुदायांनी आपला समाज समृद्ध केला आहे. असे विधान १ आक्टोंबरला पोंभूर्णा येथील तालूका क्रीडा संकुल येथे आयोजित आदिवासी संमेलन २०२४ आदिवासी समाजाच्या मेळाव्याला मार्गदर्शन करताना महामहीम राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन बोलत होते. या मेळाव्याला पोंभूर्णा तालुक्यातील व चंद्रपूर जिल्ह्यातील पंधरा हजार आदिवासी बांधव कार्यक्रमाला उपस्थित झाले होते. दरम्यान राज्यपालाचे स्वागत आदिवासी नृत्य सादर करून करण्यात आले. यावेळी आदिवासी कला पाहून भारावून गेले. व कौतुक केले.
यावेळी राज्यपाल यांनी पुढे बोलताना म्हणाले आदिवासी समाजाच्या उन्नतीसाठी आणि सर्वांगीण विकासासाठी तयार करण्यात आलेल्या विविध सरकारी योजना आणि कार्यक्रमांबद्दल जागरूकता निर्माण करण्याच्या दृष्टीने आजच्या आदिवासी मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. महाराष्ट्रात एकूण लोकसंख्येच्या साधारण ९.३५ टक्के आदिवासी आहेत. मात्र आदिवासींच्या लोकसंख्येच्या बाबतीत आपण देशात दुसऱ्या क्रमांकावर आहोत.या प्रदेशाचे नाव, ‘गोंडवाना’, आपल्याला या भूमीवर शतकानुशतके राज्य करणाऱ्या गोंड शासकांच्या वारसाची आठवण करून देते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दूरदर्शी नेतृत्वाखाली, सरकार आदिवासी जनतेच्या सर्वांगीण विकास सुनिश्चित करण्यासाठी कटिबद्धआहे.असेही ते बोलले.
दोन महिन्यांपूर्वी पदभार स्वीकारल्यापासून मी आतापर्यंत १२ हून अधिक जिल्ह्यांना भेटी दिल्या आहेत. या बैठकांमध्ये आदिवासी भागांवर विशेष लक्ष केंद्रित केले आहे. राजभवन येथे मी आदिवासी विकास विभागाच्या अधिकाऱ्यांसोबत बैठका घेतल्या आहेत आणि माझ्या जिल्ह्यांच्या दौऱ्यांमध्ये आदिवासी कल्याणासाठीच्या विविध केंद्र आणि राज्य योजनांच्या अंमलबजावणीच्या प्रक्रियेचा विशेषत्वाने आढावा घेतला आहे.येत्या काही महिन्यांत राज्यातील सर्व अनुसूचित क्षेत्रांना भेट देण्याचा माझा मानस आहे.मी विशेषतः आदिवासी आश्रम शाळा, एकलव्य मॉडेल शाळा आणि इतर कल्याणकारी कार्यक्रमांच्या सद्यस्थितीचा आढावा घेत आहे.या शाळां पैकी एक एकलव्य मॉडेल शाळा चंद्रपूर असणार असेही ते बोलले.
आदिवासी संस्कृती, भाषा आणि कला यांचे जतन करणे महत्त्वाचे असले तरी, आदिवासी समाजाच्या स्थायी प्रगतीसाठी सामाजिक आर्थिक सक्षमीकरण आवश्यक आहे, असे माझे ठाम मत आहे.हे विचारात घेऊन मी राज्यात आदिवासी विद्यापीठ स्थापन करण्यासाठी काम करत आहे.असेही ते बोलत होते.महामहिम राज्यपाल यांनी तीस मिनिटे भाषण दिले.
कार्यक्रमाला वने, सांस्कृतिक कार्य, मत्स्यव्यवसाय मंत्री तथा चंद्रपूरचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार, आ.किशोर जोरगेवार, नगराध्यक्ष सुलभा पिपरे, आदिवासी विकास अतिरिक्त आयुक्त रवींद्र ठाकरे, जिल्हाधिकारी विनय गौडा, मुख्य वनसंरक्षक डॉ. जितेंद्र रामगावकर, जिल्हा पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन, मुख्य कार्यकारी अधिकारी विवेक जाॅन्सन, आदिवासी नेते जगन येलके, अल्का आत्राम, संध्या गुरूनुले आदी उपस्थित होते.
आदिवासी मेळाव्याला मार्गदर्शन करताना महामहीम राज्यपालाने इंग्रजीत भाषण केले. यासाठी अनुवादक ठेवण्यात आले होते. त्यामुळे अनेकांना भाषण समजले नसल्याने गोंधळल्यागत झाले होते. यावेळी भाषणाला सुरुवात झाल्यानंतर दोन मिनिटे कार्डेलेस माईक सुरू नसल्याने भाषण थांबले होते. त्यानंतर तीस मिनिटे राज्यपालांनी भाषण दिले. आदिवासीच्या कल्याणासाठी, उज्वल भविष्यासाठी आदिवासी समुदायांच्या पाठीशी उभे राहणार असल्याचेही त्यांनी सांगितले. भाषण सुरू असताना राज्यपाल यांनी आपण खुश आहात ना असेही उपस्थितांना विचारले होते.
महामहिम राज्यपाल यांच्या समोर आदिवासी नृत्य सादर करण्यात आले. यावेळी आदिवासी कलेला प्रोत्साहन देण्यासाठी विविध स्टॉल्स लावण्यात आले होते. त्या स्टाॅलना राज्यपाल यांनी भेट दिली.येथील वस्तूंचे कौतुकही केले. सुरक्षेच्या दृष्टीने पोलिसांनी कडक बंदोबस्त ठेवलेला होता.
डॉ. श्यामा प्रसाद मुखर्जी योजनेच्या लाभार्थ्यांना सामुदायिक वन हक्क आणि वैयक्तिक वन हक्क उपक्रमांतर्गत धनादेश आणि तसेच जमिनीचे पट्टे देण्यात आले. तर काही महिला बचत गटांनाही लाभ देण्यात आले.
यावेळी पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी पोंभूर्णा शासकीय आयटीआयला भगवान वीर बिरसा मुंडा यांच्या नावाची घोषणा केली.यापुढे पोंभूर्णाचे आयटिआय भगवान वीर बिरसा मुंडा शासकीय आयटीआयला पोंभूर्णा या नावाने ओळखल्या जाणार आहे. यासोबतच त्यांनी तालुक्यातील पेसा अंतर्गत येणाऱ्या गावाची फाईलवर राज्यपाल मोहदय स्वाक्षरी करून राष्ट्रपतीकडे पाठवणार असल्याचे ते बोलत होते. पोंभूर्णा तालुक्यातील आदिवासी गावांना डॉ.श्यामाप्रसाद जन वन योजनेअंतर्गत पंचेवीस लक्ष रुपये देण्यात येणार असल्याची घोषणा मुनगंटीवार यांनी केली.