Thar accident: नवी कोरी थार... चाकाखाली लिंबू चिरडायला गेली अन् पहिल्या मजल्यावरून पडली खाली; व्हिडिओ व्हायरल

Bhairav Diwase

नवी दिल्ली:- नवीन थार कारचा विचित्र अपघातात चक्काचूर झाल्याची घटना दिल्लीतील निर्माण विहार येथे घडली आहे. महिंद्राच्या शोरूममध्ये एका नवीन महिंद्रा थार गाडीचा भीषण अपघात झाला आहे. गाडी पहिल्या मजल्यावरून खाली पडल्याने गाडीचं मोठं नुकसान झालं आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, गाडीचा ताबा घेण्याआधी मालकाने गाडीची पूजा करण्याचा निर्णय घेतला. पण विधीदरम्यान गाडी थेट शोरूमच्या पहिल्या मजल्यावरून खाली कोसळली. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. सुदैवाने या अपघातात कोणतीही मोठी जीवितहानी झाली नाही.


नुकतीच 27 लाखांची नवीन थार गाडी खरेदी केली होती. गाडी रस्त्यावर घेऊन जाण्यापूर्वी त्यांनी शोरूमच्या पहिल्या मजल्यावरच एक पारंपरिक विधी करण्याचा निर्णय घेतला. या विधीनुसार, गाडीच्या चाकाखाली लिंबू ठेवून त्यावर हळूच गाडी पुढे न्यायची होती. पण, या विधीदरम्यान त्यांनी चुकीने ॲक्सिलरेटरवर पाय दाबला, ज्यामुळे गाडी प्रचंड वेगाने पुढे गेली.


अचानक वेग वाढल्याने गाडीने समोरची काचेची भिंत तोडली आणि थेट पहिल्या मजल्यावरून खाली, रस्त्याच्या फुटपाथवर कार कोसळली. गाडी खाली कोसळली तेव्हा तिच्यासोबत शोरूमचा एक कर्मचारी हादेखील आतमध्ये बसलेला होता. गाडी रस्त्यावर उलटी पडल्याचे व्हिडिओमध्ये दिसत आहे.


गाडी खाली पडताच लगेचच एअरबॅग्ज (Airbags) उघडल्या, त्यामुळे गाडीतील दोघेही सुरक्षित राहिले. लगेचच त्यांना जवळच्या हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. तिथे त्यांना प्राथमिक उपचारानंतर लगेचच घरी सोडण्यात आले. या घटनेत कोणालाही गंभीर दुखापत झाली नाही आणि अद्याप कोणतीही तक्रार दाखल करण्यात आलेली नाही.