चंद्रपूर:- प्रजासत्ताक दिनाचा उत्साह सर्वत्र पाहायला मिळत असतानाच चंद्रपूर जिल्ह्यातून एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. सुटीचा आनंद साजरा करण्यासाठी बाहेर पडलेल्या काही तरुणांनी नियमांची पायमल्ली करत स्वतःचा आणि इतरांचा जीव धोक्यात घातला आहे. चंद्रपूर-जुनोना मार्गावर आज तरुणांच्या हुल्लडबाजीने सीमा ओलांडल्याचे चित्र दिसले.
प्रजासत्ताक दिनानिमित्त शहरातील जुनोना तलाव परिसरात पर्यटकांची मोठी गर्दी झाली होती. मात्र, याच गर्दीचा फायदा घेत अनेक तरुण-तरुणींनी जुनोना मार्गावर हायवेला जणू स्टंट ग्राऊंड बनवले होते. एकाच दुचाकीवर तीन ते चार जण बसून अत्यंत वेगाने गाड्या चालवत आहेत. हेल्मेटचा पत्ता नाही आणि वेगावर नियंत्रण नाही, अशा परिस्थितीत ही तरुण मंडळी हुल्लडबाजी करताना दिसत आहे.
सध्या या मार्गावर रक्ताचे सडे पाहायला मिळू शकतात. आता प्रश्न उपस्थित होतोय की, पोलीस प्रशासन आणि वाहतूक विभाग याकडे गांभीर्याने बघणार का? अशा स्टंटबाजांवर कठोर कारवाई होणार का? जेणेकरून भविष्यातील मोठे अपघात टाळता येतील.

