चंद्रपूरच्या राजकारणातून या क्षणाची सर्वात मोठी बातमी समोर येतेय. चंद्रपूर महानगरपालिकेत ऐतिहासिक विजय मिळवल्यानंतर, आता सत्तेच्या चाव्या हातात येण्यापूर्वीच काँग्रेसमध्ये मोठी 'ठिणगी' पडली आहे. खासदार प्रतिभा धानोरकर आणि विधानसभा विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांच्यातील वाद आता थेट चव्हाट्यावर आला आहे. "माझ्या मतदारसंघात ढवळाढवळ करू नका," असा थेट इशारा धानोरकरांनी वडेट्टीवारांना दिला आहे, तर वडेट्टीवारांनीही "खासदार झाले म्हणजे जिल्ह्याचे मालक होत नाही," अशा शब्दांत त्यांना सुनावले आहे. नेमका हा वाद काय आहे आणि चंद्रपूरचा महापौर कोण होणार? पाहूया या विशेष रिपोर्टमध्ये...
चंद्रपूर महानगरपालिकेत काँग्रेसने २७ जागा जिंकत सर्वात मोठा पक्ष होण्याचा मान मिळवला. पण हा आनंद फार काळ टिकला नाही. खासदार प्रतिभा धानोरकर यांनी गंभीर आरोप केला आहे की, पक्षाचेच काही बडे नेते त्यांच्या मतदारसंघातील नगरसेवकांची पळवापळवी करत आहेत. वडेट्टीवारांचे नाव न घेता त्यांनी "आपले नगरसेवक पळवणं थांबवा" असा थेट इशारा दिला आहे. महापौर निवडीच्या तोंडावर काँग्रेसमधील ही गटबाजी आता चव्हाट्यावर आली आहे.
धानोरकरांच्या या आरोपांना विजय वडेट्टीवार यांनी तितक्याच जळजळीत शब्दांत प्रत्युत्तर दिलंय. वडेट्टीवार म्हणाले, "खासदार प्रतिभा धानोरकर पक्षात नवख्या आहेत. केवळ ६ वर्षे त्यांना झाली आहेत. त्यांचे पती बाळू धानोरकर यांना मीच पक्षात आणले होते. मी २५ वर्षांपासून जिल्हा सांभाळतोय, त्यामुळे कुणी मला ढवळाढवळ करू नका असे सांगू नये." एवढेच नाही, तर धानोरकरांनीच वडेट्टीवार समर्थकांची तिकिटे कापल्याचा दावाही त्यांनी केला आहे.
| पक्ष | जागा |
|---|---|
| काँग्रेस + जनविकास: ३०
भाजप+ शिवसेना (शिंदे): २४
शिवसेना (उबाठा)+ वंचित बहुजन आघाडी: ०८
AIMIM: ०१
बहुजन समाज पार्टी: १
अपक्ष: ०२
| एकूण | ६६ |
सत्तेचे समीकरण आणि 'किंगमेकर'ची भूमिका?
चंद्रपूर पालिकेत बहुमतासाठी ३४ आकडा आवश्यक आहे. काँग्रेसकडे २७ जागा आहेत, तर भाजपकडे २३. अशातच किंगमेकर ठरलेल्या शिवसेना (उबाठा) गटाचे संदीप गिऱ्हे यांनी 'ओपन ऑफर' दिली आहे. "जो आम्हाला महापौर पद देईल, त्याला आम्ही पाठिंबा देऊ," असे गिऱ्हे यांनी जाहीर केल्याने खळबळ उडाली आहे.
मात्र, भाजपचे दिग्गज नेते सुधीर मुनगंटीवार यांनी ठाकरे गटाची ही ऑफर फेटाळून लावली आहे. "उबाठा गटाला महापौर पद देण्याचा प्रश्नच उद्भवत नाही," असे मुनगंटीवार यांनी स्पष्ट केले आहे. यामुळे आता महाविकास आघाडीत पेच निर्माण झाला असून भाजप देखील आपला महापौर बसवण्यासाठी हालचाली करत आहे.
पुढे काय होणार?
एकीकडे काँग्रेसमधील अंतर्गत कलह आणि दुसरीकडे महापौर पदासाठी शिवसेना (उबाठा) आणि भाजपमध्ये रंगलेला कलगीतुरा... यामुळे चंद्रपूर महानगरपालिकेच्या सत्तेचा पेच अधिकच गहिरा झाला आहे. विजय वडेट्टीवार आणि प्रतिभा धानोरकर यांच्यातील हा वाद दिल्ली दरबारी जाणार का? आणि सरतेशेवटी चंद्रपूरच्या महापौर पदावर कुणाची वर्णी लागणार? हे पाहणं औत्सुक्याचं ठरेल.

