चंद्रपूर:- शहरातील श्री महाकाली माता चैत्र नवरात्र यात्रा यंदा २४ मार्चपासून सुरू होत असून यात्रेच्या अनुषंगाने भाविकांसाठी आवश्यक सुविधा उपलब्ध करून देण्याच्या दृष्टीने आमदार किशोर जोरगेवार यांनी विविध विभागांच्या अधिकाऱ्यांसह महाकाली मंदिर परिसर आणि यात्रा मार्गाची पाहणी केली. यात्रेदरम्यान राज्यभरातून येणाऱ्या भाविकांना सुरक्षित व सुसज्ज सुविधा मिळाव्यात, यासाठी सर्व विभागांनी परस्पर समन्वय साधून काम करण्याच्या सूचना त्यांनी दिल्या.
यावेळी मनपा आयुक्त नरेश अकुनूरी, वेकोलीचे मुख्य महाप्रबंधक रेड्डी, मनपा उपायुक्त ताले, महावितरणचे उपविभागीय अधिकारी केळकर, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अभियंता पगारे, सहाय्यक अभियंता राठोड यांच्यासह संबंधित विभागांचे अधिकारी उपस्थित होते. तसेच प.पू. संत मनीषजी महाराज, बलराम डोडानी, अजय जयस्वाल, प्रकाश देवतळे, दशरथसिंह ठाकूर, श्याम धोपटे, रामजीवन परमार, बाबुपेठ मंडळ अध्यक्ष प्रदीप किरमे, नगरसेवक संजय कंचर्लावार, जितेश कुळमेथे, नितेश गवळे, भालचंद्र दानव, नगरसेविका ज्योती जीवने, सारिका संदूरकर, सतीश तायडे, धनराज जीवने, नगरसेविका वैशाली चंदनखेडे, संगीता अमृतकर, अजय जयस्वाल, संजय बुरघाटे, शैलेश केरझरकर, आशिष मासिकर आदींची उपस्थिती होती.
महाकाली यात्रा ही चंद्रपूर जिल्ह्यातील एक प्रमुख धार्मिक परंपरा मानली जाते. दरवर्षी या यात्रेसाठी राज्याच्या विविध भागांतून लाखोंच्या संख्येने भाविक दर्शनासाठी येतात. त्यामुळे यात्रेच्या काळात शहरात होणारी गर्दी लक्षात घेता भाविकांसाठी सर्व सोयीसुविधांची योग्य व्यवस्था उभारणे आवश्यक असल्याचे आमदार जोरगेवार यांनी यावेळी सांगितले.
यावेळी पार्किंग व्यवस्था, यात्रा परिसराचा विस्तार, भाविकांसाठी निवासाची सोय, पिण्याच्या पाण्याची उपलब्धता, स्वच्छता व्यवस्था आणि वाहतूक नियंत्रण या महत्त्वाच्या बाबींवर अधिकाऱ्यांसोबत चर्चा करण्यात आली. यात्रेदरम्यान कोणत्याही प्रकारची गैरसोय होऊ नये आणि भाविकांना सुरळीत दर्शन घेता यावे, यासाठी उत्तम नियोजन करण्याच्या सूचना देण्यात आल्या.
उन्हाळ्याचा विचार करून मंदिर परिसर आणि यात्रा मार्गावर पुरेशा प्रमाणात शुद्ध पिण्याच्या पाण्याची व्यवस्था ठेवावी, तसेच परिसरात स्वच्छता राखण्यासाठी नियमित साफसफाई आणि कचरा व्यवस्थापनाची योग्य व्यवस्था करावी, असेही त्यांनी सांगितले.
यात्रेदरम्यान भाविकांची सुरक्षितता लक्षात घेता गर्दीच्या ठिकाणी पोलिस बंदोबस्त वाढविणे, सीसीटीव्हीच्या माध्यमातून परिसरावर नजर ठेवणे आणि वाहतूक सुरळीत राहण्यासाठी स्वतंत्र नियोजन करणे आवश्यक असल्याचेही त्यांनी नमूद केले. तसेच यात्रेच्या काळात व्यापारी व दुकानदारांनी शिस्तबद्ध पद्धतीने व्यवसाय करावा. वीजपुरवठा, प्रकाशयोजना, रस्त्यांची स्थिती तसेच आपत्कालीन सेवा या सर्व बाबी सुरळीत राहाव्यात, यासाठी संबंधित विभागांनी सज्ज राहण्याच्या सूचना आमदार किशोर जोरगेवार यांनी यावेळी केल्या.
महाशिवलिंग येथील व्यवस्थेची पाहणी..
राज्यातील सर्वात मोठ्या प्राचीन शिवलिंग स्थळावरही भक्तांची गर्दी वाढत आहे. यात्रेदरम्यान येथेही मोठ्या संख्येने भाविक येण्याचा अंदाज वर्तविण्यात येत आहे. त्या अनुषंगाने येथे पेंडाल, पिण्याच्या पाण्याची व्यवस्था, तात्पुरते शौचालय तसेच इतर आवश्यक सुविधा उभारण्याच्या सूचना आमदार किशोर जोरगेवार यांनी दिल्या.

