Chandrapur News: चंद्रपूर महापालिकेत आता महिला राज! महापौरसाठी अनुजा सतीश तायडे यांचं नाव चर्चेत?

Bhairav Diwase

चंद्रपूर:- चंद्रपूर महानगरपालिकेच्या राजकारणातून मोठी बातमी समोर येत आहे. मनपाच्या महापौरपदाची सोडत आज जाहीर झाली असून, हे पद आता ओबीसी महिला प्रवर्गासाठी आरक्षित करण्यात आले आहे. या आरक्षणानंतर चंद्रपुरात नव्या महापौर कोण होणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले असतानाच, भाजपच्या विजयी उमेदवार अनुजा सतीश तायडे यांच्या नावाची जोरदार चर्चा सुरू झाली आहे.


चंद्रपूर महानगरपालिकेच्या ६६ जागांसाठी पार पडलेल्या अटीतटीच्या लढतीत कोणत्याही एका पक्षाला स्पष्ट बहुमत मिळाले नसले तरी, काँग्रेस २७ जागांसह सर्वात मोठा पक्ष ठरला आहे, तर भाजप २३ जागांवर विजयी झाला आहे. मात्र, महापौरपदाचे आरक्षण 'ओबीसी महिला' प्रवर्गासाठी निघाल्याने समीकरणे बदलली आहेत. भाजपकडून प्रभाग क्रमांक २ मधून निवडून आलेल्या अनुजा सतीश तायडे या शिक्षित आणि ओबीसी चेहरा असल्याने पक्षाकडून त्यांच्या नावावर मोहोर उमटवली जाण्याची शक्यता आहे.

अनुजा तायडे यांनी आपल्या प्रभागात केलेली कामगिरी आणि त्यांचा जनसंपर्क पाहता भाजप त्यांना संधी देऊ शकते. मात्र, दुसरीकडे काँग्रेस आणि शिवसेना (UBT) यांची महाविकास आघाडी बहुमताचा आकडा गाठण्यासाठी प्रयत्न करत असल्याने महापौर कुणाचा होणार, हे पाहणे औत्सुक्याचे ठरेल.